तुळजापूर – शहरातील गवते प्लॉट परिसरात राहणाऱ्या एका माय-लेकीने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. रत्नमाला संजय पवार (वय ४०) आणि त्यांची मुलगी प्रतिक्षा संजय पवार (वय २३) अशी आत्महत्या केलेल्या माय-लेकीची नावे आहेत.
पती आणि सासरच्या मंडळींकडून होणाऱ्या शारीरिक व मानसिक छळाला कंटाळून तसेच मुलीचे लग्न तिच्या इच्छेविरुद्ध लावल्याच्या त्रासामुळे दोघींनी हे टोकाचे पाऊल उचलल्याचा आरोप करत नातेवाईकांनी पोलिसात तक्रार दाखल केली आहे. याप्रकरणी पती, सासू, सासरे आणि दीर अशा एकूण चार जणांविरुद्ध तुळजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना २५ मार्च २०२५ रोजी दुपारी २ वाजण्याच्या सुमारास घडली. रत्नमाला आणि प्रतिक्षा या मूळच्या सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यातील करंजे गावच्या रहिवासी होत्या. सध्या त्या तुळजापूर येथील गवते प्लॉटमधील एका घरात राहत होत्या. याच घरात दोघींनी गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली.
या घटनेनंतर चार दिवसांनी, २९ मार्च २०२५ रोजी, भरत पांडुरंग खाटमोडे (वय ५५, रा. केत्तुर नं १, ता. करमाळा, जि. सोलापूर) यांनी तुळजापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. फिर्यादीनुसार, मयत रत्नमाला यांचे पती संजय भास्कर पवार (ह.मु. गवते प्लॉट, तुळजापूर), सासरे भास्कर बाजीराव पवार, सासू सिंधुबाई भास्कर पवार आणि दीर प्रभुरामचंद्र भास्कर पवार (सर्व रा. करंजे, ता. करमाळा, जि. सोलापूर) हे रत्नमाला आणि प्रतिक्षा यांना सतत शारीरिक व मानसिक त्रास देत होते. तसेच, प्रतिक्षाचे लग्न तिच्या मनाविरुद्ध लावून दिले होते. या सततच्या त्रासाला कंटाळूनच रत्नमाला आणि प्रतिक्षा यांनी आत्महत्या केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
या फिर्यादीवरून तुळजापूर पोलिसांनी आरोपी पती संजय पवार, सासरे भास्कर पवार, सासू सिंधुबाई पवार आणि दीर प्रभुरामचंद्र पवार या चौघांविरुद्ध भारतीय न्याय संहिता (भा.न्या.सं.) कलम १०८ (आत्महत्येस प्रवृत्त करणे) आणि ३(५) अन्वये गुन्हा नोंदवला आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.