लोहारा – तालुक्यातील माकणी येथे पत्राचे शेड उभारण्याच्या कारणावरून झालेल्या वादातून एका ६० वर्षीय वृद्धाला सात जणांनी मिळून गैरकायदेशीर जमाव जमवून मारहाण केल्याची आणि जातीवाचक शिवीगाळ केल्याची घटना घडली आहे. भरत शाहुराज वाघमारे (वय ६०, रा. माकणी) असे पीडित वृद्धाचे नाव असून, त्यांना काठी, हंटर व पट्ट्याने मारहाण करण्यात आल्याचा आरोप आहे. याप्रकरणी सात आरोपींविरुद्ध लोहारा पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता आणि अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये (अॅट्रॉसिटी) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना २६ मार्च २०२५ रोजी सायंकाळी सुमारे पावणे सात वाजण्याच्या सुमारास माकणी गावातील छत्रपती शिवाजी चौकाजवळ, परमेश्वर औटे यांच्या दुकानासमोर घडली. पीडित भरत वाघमारे यांनी २९ मार्च २०२५ रोजी लोहारा पोलीस ठाण्यात याप्रकरणी फिर्याद दिली.
वाघमारे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, त्यांनी पत्राचे शेड मारल्याच्या कारणावरून आरोपी विठ्ठल माणिक साठे, उध्दव बालाजी साठे, गोविंद शाहुराज साठे, दादा शाहुराज साठे, बापु प्रभाकर नरसाळे, भास्कर ढोणे, आणि व्यंकट रावसाहेब आळंगे (सर्व रा. माकणी, ता. लोहारा) यांनी गैरकायदेशीर जमाव जमवला. या सर्वांनी मिळून फिर्यादीला जातीवाचक शिवीगाळ करत लाथाबुक्यांनी, काठीने, हंटरने आणि पट्ट्याने मारहाण करून जखमी केले.
या फिर्यादीवरून लोहारा पोलिसांनी सातही आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता (भा.न्या.सं.) कलम ११८(१), १८९(२), १९१(२), १९०, ११५(२), ३५२ (गैरकायदेशीर जमाव जमवणे, मारहाण करणे, दुखापत पोहोचवणे आदिंशी संबंधित) तसेच अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याचे (अॅट्रॉसिटी कायदा) कलम ३(१)(आर) (जातीवरून अपमानित करणे) आणि ३(१)(एस) (सार्वजनिक ठिकाणी जातीवाचक शिवीगाळ करणे) अन्वये गुन्हा नोंदवला आहे. लोहारा पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.