धाराशिव: जिल्ह्यात कोणत्याही सण-उत्सवाच्या किंवा इतर कारणांच्या नावाखाली व्यापारी वर्गाकडून जोर-जबरदस्तीने किंवा अरेरावी करून वर्गणी वसूल केल्यास संबंधित व्यक्तींवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा स्पष्ट इशारा धाराशिवचे पोलीस अधीक्षक संजय जाधव यांनी दिला आहे.
आज दिनांक २ एप्रिल २०२५ रोजी पोलीस अधीक्षक कार्यालयातील सभागृहात जिल्ह्यातील विविध व्यापारी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत अनेक व्यापाऱ्यांनी त्यांच्याकडून काही असामाजिक घटकांकडून सक्तीने आणि दादागिरी करून वर्गणी घेतली जात असल्याच्या तक्रारी मांडल्या. या प्रकारांपासून कायदेशीर संरक्षण मिळावे, अशी मागणीही त्यांनी केली.
व्यापाऱ्यांनी मांडलेल्या समस्यांची गंभीर दखल घेत पोलीस अधीक्षक. जाधव यांनी कडक शब्दात सूचना दिल्या. ते म्हणाले, “धाराशिव जिल्ह्यात अशा प्रकारची जोर-जबरदस्ती अजिबात खपवून घेतली जाणार नाही. कोणीही वर्गणीसाठी व्यापाऱ्यांना त्रास देत असेल किंवा जबरदस्ती करत असेल, तर त्यांच्यावर तातडीने कायदेशीर कारवाई केली जाईल.” व्यापाऱ्यांनी अशा प्रसंगी न घाबरता तात्काळ पोलिसांत तक्रार दाखल करावी, असे आवाहनही त्यांनी केले. दाखल झालेल्या प्रत्येक तक्रारीची गंभीर दखल घेतली जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले.
यापुढे व्यापाऱ्यांच्या सोयीसाठी संबंधित पोलीस स्टेशनचे अधिकारी आणि बीट अंमलदार यांचे मोबाईल नंबर प्रसारित केले जातील, जेणेकरून गरजेच्या वेळी संपर्क साधता येईल. तसेच, जिल्ह्यातील मुख्य बाजारपेठा आणि व्यापारी संकुलांमध्ये पोलिसांची गस्त (पेट्रोलिंग) वाढवण्यात येणार असून, पोलिसांचा वावर अधिक दिसेल (Visible Policing) यावर भर दिला जाईल, असेही जाधव यांनी स्पष्ट केले.
उपस्थित होते.
हनुमान जयंती, राम नवमी, 11 एप्रिल रोजी महात्मा ज्योतिबा फुले, 14 एप्रिल रोजी घटनेचे शिल्पकार महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती अशा निमित्ताने अधिकृत आणि अनधिकृत मंडळाचे पदाधिकारी, व्यापार्यांकडे मनमानी पद्धतीने आर्थिक वर्गणी मागणी करत आहेत. वर्गणी मागणार्या अनेक मंडळांची अधिकृत नोंद न्यास विभागाकडे नाही. याबाबत पोलीस प्रशासनाने वस्तुस्थिती लक्षात घ्यावी आणि व्यापार्यांवर वर्गणीसाठी होणारा दबाव दूर व्हावा याकरिता जिल्हा पोलीस अधीक्षकांना व्यापारी शिष्टमंडळाने, भेटून वस्तुस्थिती मांडली आहे. पोलीस प्रशासनाच्या वतीने, पोलीस पथसंथलन करून, जनजागृती केली जाणार आहे. व्यापारी मंडळांनी भयमुक्त राहावे. जयंती उत्सव मंडळांना अव्वाच्या सव्वा वर्गणी देऊ नये असे आवाहन करण्यात आले आहे.
या वेळी उपविभागीय पोलीस अधिकारी स्वप्नील राठोड आणि जिल्ह्यातील विविध व्यापारी संघटनांचे पदाधिकारी मराठवाडा उपाध्यक्ष संजय मोदानी, जिल्हाध्यक्ष लक्ष्मीकांत (बंटी) जाधव, केमिस्ट अॅन्ड ड्रगिस्ट असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष धनाजी आनंदे, सराफ सुवर्णकार असोसिएशनचे कपील शर्मा, हॉटेल ॲन्ड बार असोसिएशनचे बापू सूर्यवंशी, जिल्हा सिड्स अॅन्ड फर्टिलायजर असोसिएशनचे संजय मोदानी, जिल्हा मशिनरी असोसिएशनचे अविनाश काळे, जिल्हा फर्निचर अॅन्ड इलेक्ट्रॉनिक्सचे अजहर खान, जिल्हा मुद्रक संघाचे महादेव मुळे, तालुका व्यापारी महासंघाचे नितीन फंड, उपाध्यक्ष विशाल थोरात, अमित मोदानी, संपतराव डोके, जिल्हा सचिव महेश वडगावकर, नितिन नायर, सुभाष शेट्टी, श्याम बजाज व इतर व्यापारी उपस्थित होते.