परंडा – कधी कधी क्षणभरात घडणाऱ्या घटनांचा आघात इतका तीव्र असतो की काळीज सुन्न होतं, शब्द हरवतात आणि श्वास अडखळतो. परंडा येथील एस.जे.आर.जे. शिंदे महाविद्यालयात निरोप समारंभादरम्यान घडलेली वर्षा खरात हिची आकस्मिक आणि वेदनादायक मृत्यूकथा अशीच काळजात खोल जखम करणारी ठरली.
वर्षा खरात – अवघ्या वीसाव्या वर्षी आयुष्याची स्वप्नं बघणारी, हसतमुख, उत्साही आणि हुशार विद्यार्थिनी. बी.एस्सी.च्या अंतिम वर्षात शिक्षण घेत असताना आपल्या निरोप भाषणात तिने मैत्रिणींना हसवले, शिक्षकांचे आभार मानले आणि एका हसऱ्या चेहऱ्याने व्यासपीठावर उभी राहिली. पण त्या क्षणांचे नशीब काही वेगळंच लिहून आलं होतं…
भाषण करत असताना तिला अचानक चक्कर आली. व्यासपीठावरच ती कोसळली. उपस्थितांनी धावपळ करून तिला शासकीय रुग्णालयात दाखल केलं. पण नियतीच्या लेखी काही वेगळंच होतं – डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं. त्या क्षणी समारंभाचा आनंद दु:खात बदलला, आणि संपूर्ण महाविद्यालयावर शोककळा पसरली.
वर्षा ही एका शेतकऱ्याची मुलगी. तिच्या चेहऱ्यावर कायम असणाऱ्या हसऱ्या आभाळाखाली अनेक स्वप्नं होती – कुटुंबासाठी, समाजासाठी, स्वतःच्या आयुष्यासाठी. पण २०१२ साली झालेल्या हृदयविकाराच्या शस्त्रक्रियेनंतरही तिने हार मानली नाही. शिक्षणाची ज्योत तिने न थांबता पेटवत ठेवली. आज ती गेलेली असली, तरी तिचं हसणं, तिचं भाषण, तिच्या डोळ्यांतील स्वप्नं – हे सारे आजही त्या व्यासपीठावर जिवंत आहेत.
ती गेली, पण मागे सोडून गेली आठवणींची शिदोरी…
ती हसली, आणि आपल्याला रडवत गेली…
ती बोलली, आणि काळजाला भिडून गेली…
शिंदे महाविद्यालयाच्या इतिहासात हा दिवस काळा ठरेल – कारण तो फक्त निरोपाचा नव्हता, तर एका निष्पाप, स्वप्नाळू जीवाच्या शेवटचा श्वास होता.
वर्षा खरात यांना भावपूर्ण श्रद्धांजली.
ईश्वर तिच्या आत्म्यास शांती देवो, आणि कुटुंबियांना हे दुःख सहन करण्याची शक्ती प्रदान करो.