उमरगा पंचायत समितीचे तत्कालीन गटशिक्षणाधिकारी यांच्यावर मनमानी कारभाराचा आरोप करत महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या धाराशिव शाखेने त्यांच्या चौकशीची मागणी केली आहे. याबाबतचे निवेदन समितीने जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना सादर केले आहे. मागण्या मान्य न झाल्यास २१ एप्रिल रोजी तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही समितीने दिला आहे.
निवेदनात समितीने दोन प्रमुख मुद्दे मांडले आहेत.
पहिला मुद्दा: मुख्याध्यापक पदभार बदलण्यात मनमानी
तत्कालीन गटशिक्षणाधिकाऱ्यांनी जि.प. प्राथमिक शाळा, बालाजीनगर येथील महिला मुख्याध्यापिकेचा पदभार मनमानी पद्धतीने काढून घेतला आणि तो दुसऱ्या शाळेच्या मुख्याध्यापकाकडे सोपवला, असा आरोप समितीने केला आहे. दोन्ही शाळा स्वतंत्र असून, संबंधित महिला मुख्याध्यापिकेने २०२५-२६ या शैक्षणिक वर्षाचे नियोजन केले होते व इयत्ता पहिलीचा पट ९० पर्यंत जाण्याची शक्यता वर्तवली होती. असे असतानाही एकशिक्षकी शाळेच्या धोरणाचा भंग करत हा बदल करण्यात आला. तालुक्यातील इतर शाळांमध्ये मात्र असा कोणताही बदल करण्यात आला नाही, याकडे समितीने लक्ष वेधले आहे. या कारवाईमुळे संबंधित महिला मुख्याध्यापिकेवर अन्याय झाला असून त्यांना न्याय मिळावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
दुसरा मुद्दा: शिक्षक प्रशिक्षणातील अनियमितता
तालुक्यात झालेल्या एकदिवसीय शिक्षक प्रशिक्षणात अनियमितता झाल्याचा आरोपही समितीने केला आहे. प्रशिक्षणातील पहिल्या केवळ दोन तुकड्यांनाच साध्या प्रकारचे जेवण देण्यात आले. प्रतिनिधींच्या सूचनेनुसार दोन वेळा चहा आणि लेखन साहित्य देणे अपेक्षित असताना ते दिले गेले नाही. इतर तुकड्यांतील शिक्षकांना जेवण किंवा लेखन साहित्य काहीच मिळाले नाही. त्यामुळे या प्रशिक्षणाच्या खर्चाचीही सखोल चौकशी झाली पाहिजे, असे समितीचे म्हणणे आहे.
आंदोलनाचा इशारा
“वरील दोन्ही प्रकरणांची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करावी आणि पीडित महिला मुख्याध्यापिकेला न्याय द्यावा,” अशी मागणी समितीने मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे केली आहे. “प्रशिक्षण खर्चाची चौकशी आणि मुख्याध्यापिकेला न्याय न मिळाल्यास, समिती २१ एप्रिल २०२५ रोजी तीव्र आंदोलन करेल,” असा इशाराही निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.
या निवेदनावर समितीचे राज्य उपाध्यक्ष विलास कंटकुरे , राज्य कार्यकारिणी सदस्य कल्याण बेताळे , मराठवाडा विभागीय सरचिटणीस शिवाजी कवाळे, जिल्हा नेते बाबुराव कोकाटे, कार्याध्यक्ष रामदास गायकवाड, जिल्हा सरचिटणीस लक्ष्मण बनसोडे आणि जिल्हाध्यक्ष रमेश बारसकर यांच्यासह पदाधिकाऱ्यांच्या सह्या आहेत. आता जिल्हा परिषद प्रशासन यावर काय भूमिका घेते, याकडे शिक्षक वर्गाचे लक्ष लागले आहे.