तुळजापूर – तुळजापूर पोलिसांनी शहरातील जुन्या बसस्थानक परिसरात सुरू असलेल्या श्रीदेवी मटका जुगारावर गुरुवारी, रविवार दि. ६ एप्रिल रोजी दुपारी छापा टाकला. या कारवाईत पोलिसांनी दोन आरोपींना रंगेहाथ पकडले असून, त्यांच्याकडून जुगाराचे साहित्य आणि रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, तुळजापूर पोलीस ठाण्याचे पथक हद्दीत गस्त घालत असताना, रविवार दि. ६ एप्रिल रोजी दुपारी १२ वाजून १० मिनिटांच्या सुमारास जुन्या बसस्थानक परिसरात सार्वजनिक ठिकाणी काही व्यक्ती जुगार खेळत असल्याची माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी छापा टाकला.
यावेळी नितीन राजाभाऊ तुकडे (वय ३६ वर्षे, रा. अमृतवाडी, ता. तुळजापूर, ह.मु. हाडको, तुळजापूर) आणि सुरज सतीश कोठावळे (रा. शुक्रवार परमेश्वरवाडी, तुळजापूर, जि. धाराशिव) हे दोघे श्रीदेवी मटका नावाचा जुगार खेळताना आणि खेळवताना आढळून आले. पोलिसांनी त्यांच्या ताब्यातून जुगाराचे साहित्य आणि एकूण १,८९० रुपये रोख रक्कम जप्त केली. यातील आरोपी सुरज सतीश कोठावळे हा शिवसेना शिंदे गट युवासेनाचा जिल्हा उपप्रमुख आहे. त्याचे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्यासोबतचे फोटो सोशल मीडियावर झळकले आहेत.
याप्रकरणी दोन्ही आरोपींविरुद्ध तुळजापूर पोलीस ठाण्यात महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायद्याच्या कलम १२(अ) अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या कारवाईमुळे शहरातील अवैध धंद्यांवर पोलिसांची करडी नजर असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. पुढील तपास तुळजापूर पोलीस करत आहेत.