धाराशिव: मंडळी, धाराशिव शहरात सध्या एका दुकानाची भलतीच चर्चा सुरू आहे. नाव आहे “बाबा टेंडर्स‘. आता नाव ऐकून वाटेल की इथे बाबांच्या आशीर्वादाने मोठे मोठे टेंडर मिळत असतील, पण छे! इथे दर्शनी भागात मिळतात लहान मुलांचे आवडते चिप्स आणि कुरकुरे. पण खरा ‘खेळ’ तर पडद्यामागे सुरू होता म्हणे!
आपल्या शहर पोलिसांना कुठूनतरी ‘कुरकुरीत’ बातमी मिळाली की, या ‘बाबा टेंडर्स‘मध्ये चिप्स-कुरकुऱ्यांच्या पाकिटांमागून चक्क गुटख्याच्या पुड्यांचा डोंगर विकला जातोय. मग काय, पोलिसांनी ठरवलं की या ‘टेंडर’ची जरा चौकशी करावी!
आज पोलिसांनी एकदम फिल्मी स्टाईलने दुकानावर छापा टाकला. दुकानात समोर गोंडस पाकीटं दिसत होती, पण मागच्या बाजूला जाताच पोलिसांचे डोळे विस्फारले. तिथे गुटख्याचा एवढा मोठा साठा सापडला की, विचारू नका! जणू काही ‘बाबां’नी गुटख्याचाच ‘महाप्रसाद’ वाटायला सुरुवात केली होती!
पण मंडळी, खरी गंमत तर पुढेच आहे! आता बातमी अशी आहे की, हा जप्त केलेला गुटख्याचा माल दुसऱ्याच कुठल्यातरी ठिकाणाहून पकडला असं दाखवण्याचा ‘घाट’ घातला जातोय. म्हणजे, पोलिसांच्या जाळ्यात सापडलेला ‘महाप्रसाद’ आता म्हणे, “मी इथे नव्हतोच!” असं म्हणायच्या तयारीत आहे.
आणि सगळ्यात मोठा विनोद म्हणजे, या सगळ्या प्रकरणात पडद्यामागचे खरे ‘ बाबा’ (म्हणजे मेन मालक -पिके ) नामानिराळे राहून, दुसऱ्याच कुण्या ‘भक्ता’ला बळीचा बकरा बनवण्याची जोरदार ‘टेंडर’ प्रक्रिया पडद्यामागे सुरू असल्याची कुजबुज आहे. यालाच म्हणतात ‘तोडपाणी’ची किमया!
आता पोलीस नक्की कोणत्या ‘टेंडर’ला मान्यता देतात आणि खरा ‘ बाबा’ समोर येतो का, हे पाहणं फारच रंजक ठरणार आहे. तोपर्यंत, धाराशिवकरांनी चिप्स खाताना जरा जपूनच – आतून गुटख्याची पुडी निघाली तर आश्चर्य वाटायला नको! 😉