नळदुर्ग : धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर तालुक्यातील शहापूर शिवारात शेतीच्या बांधाच्या कारणावरून दोन कुटुंबांमध्ये जोरदार हाणामारी झाल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी दोन्ही गटांनी नळदुर्ग पोलीस ठाण्यात परस्परविरोधी फिर्यादी दिल्या असून, पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना दिनांक ६ एप्रिल २०२५ रोजी सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास शहापूर शिवारातील शेतात घडली.
पहिल्या घटनेत, डिगंबर दत्तू काळे (वय ६० वर्षे, रा. शहापूर) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, हरिश्चंद्र यादव कुंभार, किरण हरिश्चंद्र कुंभार, मंगलबाई हरिश्चंद्र कुंभार, मनिषा राम कुंभार, पूनम किरण कुंभार आणि राम हरिश्चंद्र कुंभार (सर्व रा. शहापूर) यांनी शेतातील बांधाच्या कारणावरून गैरकायदेशीर मंडळी जमवून फिर्यादी डिगंबर काळे यांना शिवीगाळ केली. तसेच लाथाबुक्क्यांनी, दगडाने (इगड) व काठीने मारहाण करून जखमी केले. भांडण सोडवण्यासाठी आलेल्या फिर्यादीची पत्नी संगीता, मुलगा नेताजी व भाऊ संभाजी यांनाही आरोपींनी शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली व जीवे ठार मारण्याची धमकी दिली. या फिर्यादीवरून नळदुर्ग पोलिसांनी दिनांक ७ एप्रिल २०२५ रोजी आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता (भा.न्या.सं.) कलम ११८(१), ११५(२), ३५२, ३५१(२), १८९(२), १९१(२), १९१(३), १९० अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
दुसऱ्या घटनेत, मनिषा राम कुंभार (वय २७ वर्षे, रा. शहापूर) यांनी दिलेल्या वैद्यकीय जबाबावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, नेताजी दिगंबर काळे, दिगंबर दत्तात्रय काळे, बबन दत्तात्रय काळे आणि संगीता दिगंबर काळे (सर्व रा. शहापूर) यांनी शेतातील सामाईक बांध कोरण्याच्या व बांधावर दगड टाकण्याच्या कारणावरून फिर्यादी मनिषा कुंभार यांना शिवीगाळ केली. तसेच लाथाबुक्क्यांनी, काठीने व कुऱ्हाडीने मारहाण करून गंभीर जखमी केले. यावेळी फिर्यादीचे दीर किरण हरिश्चंद्र कुंभार व सासरे हरिश्चंद्र कुंभार यांनाही आरोपींनी शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी मारहाण करून जखमी केले. या जबाबावरून नळदुर्ग पोलिसांनी दिनांक ७ एप्रिल २०२५ रोजी आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता (भा.न्या.सं.) कलम ११८(२), ११८(१), ११५(२), ३५२, ३(५) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
एकाच दिवशी शेतीच्या वादातून दोन कुटुंबांमध्ये झालेल्या या हाणामारीमुळे परिसरात तणावाचे वातावरण आहे. नळदुर्ग पोलीस दोन्ही प्रकरणांचा अधिक तपास करत आहेत.