धाराशिव – धाराशिव शहरातील बार्शी नाका परिसरात एका व्यक्तीला तिघा जणांनी कोणतीही पूर्वकल्पना नसताना, विनाकारण अडवून लोखंडी पट्टी, सळई आणि दांडक्याने मारहाण केल्याची घटना उघडकीस आली आहे. ८ एप्रिल रोजी भरदिवसा हा प्रकार घडला असून, याप्रकरणी धाराशिव शहर पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, दिलीप शिवाजी राठोड (वय ३९ वर्षे, रा. उंबरे कोठा, वासुदेव गल्ली, धाराशिव) यांनी ११ एप्रिल २०२५ रोजी धाराशिव शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादीनुसार, ते ८ एप्रिल रोजी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास बार्शी नाक्यावरील बंडगर बेकरीसमोर होते. यावेळी अभिजीत संतोष जाधव, संतोष सुभाष जाधव (दोघे रा. भगतसिंगनगर तांडा, धाराशिव) आणि अजय बाबासाहेब राठोड (रा. पिवळी टाकी जवळ, धाराशिव) यांनी त्यांना अडवले.
आरोपींनी दिलीप राठोड यांना काहीही कारण नसताना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली आणि लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. इतकेच नाही, तर आरोपींनी लोखंडी पट्टी, लोखंडी सळई आणि लाकडी दांड्याने मारहाण करून त्यांना जखमी केले. तसेच, ‘तुला जिवंत सोडणार नाही’ अशी जीवे ठार मारण्याची धमकीही दिली.
दिलीप राठोड यांच्या फिर्यादीवरून, धाराशिव शहर पोलिसांनी आरोपी अभिजीत जाधव, संतोष जाधव आणि अजय राठोड यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम ११८(१), ११५(२), ३५२, ३५१(२), ३(५) अन्वये गुन्हा नोंदवला आहे. हा हल्ला विनाकारण करण्यात आल्याचे फिर्यादीत म्हटले असून, पोलीस मारहाणीमागील नेमक्या कारणाचा आणि पुढील तपास करत आहेत.