कळंब –‘माझ्या भावाला दारू का पाजलीस’ या कारणावरून एका व्यक्तीला शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी आणि लोखंडी गजाने जबर मारहाण केल्याची घटना कळंब तालुक्यातील खोंदला येथे घडली. याप्रकरणी एका व्यक्तीविरुद्ध कळंब पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सतीश चिंतांबर टेकाळे (वय ४३ वर्षे, रा. खोंदला, ता. कळंब, जि. धाराशिव) यांनी १२ एप्रिल २०२५ रोजी कळंब पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, २७ मार्च २०२५ रोजी रात्री सुमारे साडेआठ वाजता (२०.३० वा.) खोंदला पाटी येथील रोडवर आरोपी प्रदीप राजाभाऊ मुळीक (रा. खोंदला, ता. कळंब) याने फिर्यादी सतीश टेकाळे यांना अडवले.
‘तू माझ्या भावाला दारू का पाजलीस’ असे म्हणत आरोपी प्रदीप मुळीक याने सतीश टेकाळे यांना शिवीगाळ केली. त्यानंतर त्यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली आणि लोखंडी गजाने मारून गंभीर जखमी केले.
घटनेनंतर तब्बल १५ दिवसांनी सतीश टेकाळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून, कळंब पोलिसांनी आरोपी प्रदीप राजाभाऊ मुळीक याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम ११७, ११८(१), ११५(२), ३५२ अन्वये गुन्हा नोंदवला आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत.