येरमाळा : कत्तलीच्या उद्देशाने गोवंशिय जनावरांची टेम्पोमधून अत्यंत निर्दयीपणे वाहतूक करणाऱ्या एका व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. येरमाळा पोलिसांनी भुम-पार्डी रोडवर ही कारवाई करत टेम्पोसह सुमारे ६ लाख २२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, येरमाळा पोलिसांना शनिवारी (१२ एप्रिल २०२५) सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास भुमकडून पार्डीकडे जाणाऱ्या रोडवर एका आयशर टेम्पोबद्दल (क्र. एमएच २३ डब्ल्यु ११३७) संशय आला. त्यांनी टेम्पो थांबवून तपासणी केली असता, त्यात गोवंशिय जनावरे दाटीवाटीने भरलेली आढळून आली.
टेम्पोमध्ये ११ जर्सी गायी, १ खिलारा बैल आणि १ रेडकू असे एकूण १३ गोवंशीय जनावरे (अंदाजे किंमत १,२२,००० रुपये) होती. या जनावरांना चारा-पाण्याची कोणतीही व्यवस्था न करता, अत्यंत निर्दयपणे कत्तलीसाठी नेले जात असल्याचे स्पष्ट झाले.
पोलिसांनी तात्काळ टेम्पोचालक शेख अमीर शेख खैरोद्दीन (वय ३१ वर्षे, रा. नेकणुर, ता. जि. बीड) याला ताब्यात घेतले. जनावरे आणि टेम्पो (एकूण किंमत अंदाजे ६,२२,००० रुपये) जप्त करण्यात आला.
याप्रकरणी येरमाळा पोलिसांनी सरकारतर्फे फिर्याद दिली असून, वाशी पोलीस ठाण्यात आरोपी शेख अमीर शेख खैरोद्दीन याच्याविरुद्ध महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम, प्राण्यांना क्रूरतेने वागण्यास प्रतिबंध अधिनियम आणि प्राण्यांचे परिवहन नियम यांच्या संबंधित कलमांन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत.