तुळजापूर – तुळजापूर शहरात एका पान टपरीवर फाटकी वीस रुपयांची नोट न घेतल्याच्या क्षुल्लक कारणावरून एका तरुणाला चाकुने भोसकून गंभीर जखमी करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी चार जणांविरुद्ध तुळजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्यांना जिवे ठार मारण्याची धमकीही देण्यात आल्याचे फिर्यादीत नमूद आहे. घटनेनंतर तीन दिवसांनी फिर्याद दाखल करण्यात आली आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना दि. १५ एप्रिल २०२५ रोजी सायंकाळी साडेसात वाजताच्या सुमारास तुळजापूर येथील रॉयल पान स्टॉल, घाटशिळ पार्किंग समोर घडली. फिर्यादी रोहन तानाजी बनपट्टे (वय २१, रा. वेताळनगर तुळजापूर) हे पान टपरीवर असताना, आरोपी जयराम बब्रुवान भोसले, विशाल जयराम भोसले (दोघे रा. डिकामल पारधी पिडी तुळजापूर), विजय बब्रुवान भोसले, आणि प्रदीप अरुण शिंदे (दोघे रा. वेताळनगर तुळजापूर) यांनी त्यांच्याशी वाद घालण्यास सुरुवात केली.
हा वाद एका फाटकी वीस रुपयांची नोट न स्वीकारल्याच्या कारणावरून झाला. आरोपींनी रोहन बनपट्टे याला सुरुवातीला शिवीगाळ केली. त्यानंतर लाथाबुक्यांनी मारहाण करत त्यांच्याकडील चाकुने रोहन याच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात रोहन बनपट्टे गंभीर जखमी झाला. आरोपींनी त्याला जिवे ठार मारण्याची धमकी देऊन घटनास्थळावरून पोबारा केला.
या घटनेनंतर जखमी रोहन तानाजी बनपट्टे यांनी दि. १८ एप्रिल २०२५ रोजी तुळजापूर पोलीस ठाण्यात येऊन घडलेल्या प्रकाराची फिर्याद दिली. त्यांच्या प्रथम खबरेवरून आरोपी जयराम बब्रुवान भोसले, विशाल जयराम भोसले, विजय बब्रुवान भोसले, आणि प्रदीप अरुण शिंदे या चार जणांविरुद्ध तुळजापूर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम ११८(२), ११८(१), ११५(२), ३५१(२), ३५१(३), ३५२, ३(५) अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
या गुन्ह्याचा पुढील तपास तुळजापूर पोलीस करत आहेत. क्षुल्लक कारणावरून चाकुने हल्ला झाल्याच्या घटनेने शहरात खळबळ उडाली आहे.