येरमाळा- येरमाळा पोलीस ठाणे हद्दीतील वाघोली येथे कुटुंबातील वाद विकोपाला जाऊन एका व्यक्तीला कुऱ्हाड व काठीने मारहाण करून गंभीर जखमी केल्याचा प्रकार समोर आला आहे. भावाला शिवीगाळ का केली, असे विचारल्याच्या कारणावरून हा हल्ला करण्यात आला असून, या प्रकरणी वडील व त्यांच्या दोन मुलांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत जखमी संभाजी महादेव धोंगडे (वय ४६, रा. वाघोली ता.कळंब जि. धाराशिव) यांच्या वैद्यकीय जबाबावरून येरमाळा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. १६ एप्रिल २०२५ रोजी सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास वाघोली येथील बस स्टँड चौकातील चिकन सेंटर दुकानासमोर ही घटना घडली.
फिर्यादी संभाजी धोंगडे यांनी आरोपी शहाजी भागवत धोंगडे, सौरभ शहाजी धोंगडे आणि शुभम शहाजी धोंगडे (सर्व रा. वाघोली) यांना त्यांच्या भावाला शिवीगाळ का केली, असे विचारले होते. या किरकोळ कारणावरून आरोपींनी संभाजी धोंगडे यांना शिवीगाळ केली व जिवे ठार मारण्याच्या उद्देशाने लाथाबुक्यांनी, तसेच कुऱ्हाडीने व काठीने त्यांच्या डोक्यात गंभीर मारहाण केली.
या हल्ल्यात संभाजी धोंगडे गंभीर जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मारहाणीनंतर आरोपींनी त्यांना जिवे मारण्याची धमकीही दिली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
जखमी संभाजी धोंगडे यांच्या वैद्यकीय जबाबावरून १९ एप्रिल २०२५ रोजी येरमाळा पोलीस ठाण्यात आरोपी शहाजी भागवत धोंगडे, सौरभ शहाजी धोंगडे, शुभम शहाजी धोंगडे यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम १०९, ११८(१), ११८(२), ३५२, ३५१(२), ३(५) अन्वये गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास येरमाळा पोलीस करत आहेत.