तुळजापूर – तुळजापूरच्या विश्वनाथ कॉर्नरवर ९ एप्रिलच्या पहाटे दोन ‘वसूलदार’ पोलिसांनी एक पिकअप गाडा पकडला.
ही गाडी सोलापूरवरून ‘तंबाखू-एक्सप्रेस’ बनून लातूरमार्गे भोकर ( नांदेड ) कडे धाव घेत होती. गाडीत काय होतं? तर गुटख्याच्या गर्भात जन्म घेणारा सुगंधी कच्चा माल – तंबाखूचा वास घेऊनही नशा चढेल असा!
माल पकडला, पिकअप पोलिस स्टेशनमध्ये पार्क केला, पण मग पुढे काय?
गाडीचं पुढचं काय झालं, हे विचाराल तर उत्तर मिळेल – “पंचनामा झाला आहे… सेनापल (सॅम्पल) छत्रपती संभाजीनगरला पाठवले आहे…”
पण प्रश्न असा — जेव्हा गुन्हाच दाखल नाही, तर सेनापल कोणत्या गुन्ह्याचा पाठवलात भाऊ? की ‘शांपल’ पाठवण्याचा नवा ट्रेंड आलाय – “No FIR, just FYI!”
दहा दिवस झाले, पिकअप ‘स्टेशनरी’ अवस्थेत होता. पण शेवटी “तोडपाणी आणि थोडं कौशल्य” लावून पिकअप पिक-अप करून सोडण्यात आला.
🕵️♂️ आता स्थानिकांचे प्रश्न –
- गुन्हा नाही, तरी माल का जप्त?
- सॅम्पल कोणाच्या नावे पाठवलं?
- आणि नेहमीप्रमाणे, कितीचा सेटिंग झाला?
तंबाखूचा वास तर पिकअपमधून येत होता, पण ‘भलताच’ वास आता पोलीस स्टेशनातून येतोय…