शिराढोण- कळंब तालुक्यातील खामसवाडी येथे प्रेमविवाह केल्याच्या रागातून एका ३५ वर्षीय कॉम्प्युटर सेंटरचालकावर टोळक्याने बेदम हल्ला चढवला. धारदार चाकू, लोखंडी रॉड आणि लाथाबुक्क्यांनी मारहाण करून तरुणाला गंभीर जखमी करण्यात आले, तर गाडीतून खाली न उतरल्याचा जाब विचारत त्याच्या पत्नीलाही चापटीने मारहाण करण्यात आली. याप्रकरणी जखमी तरुणाच्या वैद्यकीय जबाबावरून शिराढोण पोलीस ठाण्यात दोन महिलांसह ५ जणांविरुद्ध गंभीर कलमांन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
नेमकी घटना काय?
खामसवाडी (ता. कळंब) येथील रहिवासी भैरवनाथ रमेश थोडसरे (वय ३५ वर्षे) हे गावात हायटेक कॉम्प्युटर सेंटर चालवतात. त्यांनी केलेल्या प्रेमविवाहाचा राग आरोपींच्या मनात खदखदत होता.
१२ ऑक्टोबर २०२६ रोजी दुपारी १.०० वाजेच्या सुमारास भैरवनाथ हे खामसवाडीतील आपल्या हायटेक कॉम्प्युटर सेंटरजवळ उपस्थित होते. त्यावेळी गावातीलच संशयित आरोपींनी गैरकायद्याची मंडळी जमवून तिथे धाव घेतली. “तू प्रेमविवाह का केलास?” या कारणावरून त्यांनी भैरवनाथ यांना अश्लील शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. त्यानंतर आरोपींनी लाथाबुक्क्यांसह हातातील धारदार चाकू आणि लोखंडी रॉडने सपासप वार करून त्यांना गंभीर जखमी केले. याच दरम्यान भैरवनाथ यांच्या पत्नी गाडीत बसलेल्या असताना, “तू गाडीतून खाली का उतरत नाहीस?” असा जाब विचारत आरोपींनी त्यांनाही चापटीने मारहाण केली तसेच जीवे ठार मारण्याची धमकी दिली.
शिराढोण पोलिसांत ५ जणांवर गुन्हा नोंद
हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या भैरवनाथ थोडसरे यांच्यावर रुग्णालयात उपचार करण्यात आले. त्यांनी दिलेल्या वैद्यकीय जबाबावरून १६ ऑक्टोबर २०२६ रोजी शिराढोण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला:
-
आरोपी :
१) लक्ष्मण श्रीमंत तांबारे
२) महेश शेषेराव शेळके
३) हणुमंत श्रीमंत तांबारे
४) मंजुश्री श्रीमंत तांबारे
५) राजेश्री लक्ष्मण तांबारे (सर्व रा. खामसवाडी, ता. कळंब, जि. धाराशिव)
-
दाखल कलमे : भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ११८(२), ११५(२), ३५२, ३५१(२), १८९(२), १९०, १९१(१) आणि १९१(२)(३).
भरदिवसा गावात घडलेल्या या हिंसक हल्ल्यामुळे परिसरात खळबळ उडाली असून, या प्रकरणाचा पुढील तपास शिराढोण पोलीस करत आहेत.



