धाराशिव: ‘चोरी करू नका’ असे म्हटल्याच्या क्षुल्लक कारणावरून एका दाम्पत्याला जमावाने शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी आणि चाकूने मारहाण केली. एवढ्यावरच न थांबता, पतीला मोटरसायकलवर बसवून अज्ञात ठिकाणी पळवून नेल्याची धक्कादायक घटना धाराशिव तालुक्यातील पाटोदा येथे घडली आहे. याप्रकरणी पत्नीने दिलेल्या फिर्यादीवरून बेंबळी पोलीस ठाण्यात १० जणांविरुद्ध अपहरणासह विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, उषा दिनेश शिंदे (वय ३४, रा. समर्थ नगर, धाराशिव) यांनी बेंबळी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, त्या आणि त्यांचे पती दिनेश शिंदे हे २२ एप्रिल २०२५ रोजी दुपारी ३:३० वाजण्याच्या सुमारास पाटोदा (ता. जि. धाराशिव) येथे होते. यावेळी त्यांनी गावातील काही लोकांना ‘चोरी करू नका’ असे समजावून सांगितले.
याचा राग मनात धरून आरोपी अवि दिलीप भोसले, सन्या दिलीप भोसले, रवी टरलिंग्या पवार, विजय दिलीप भोसले, केशव चिप्या पवार, कालिंदा दिलीप भोसले, चिमी अविनाश भोसले, पल्लवी विजय भोसले, काजल अजय भोसले आणि अजय दिलीप भोसले (सर्व रा. पाटोदा, ता. जि. धाराशिव) यांनी गैरकायद्याची मंडळी जमवली. आरोपींनी फिर्यादीचे पती दिनेश शिंदे यांना शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी आणि चाकूने मारहाण करून जखमी केले.
हे भांडण सोडवण्यासाठी फिर्यादी उषा शिंदे मध्ये गेल्या असता, आरोपींनी त्यांनाही मारहाण करून जखमी केले. यानंतर, आरोपींनी दिनेश शिंदे यांना जबरदस्तीने मोटरसायकलवर बसवून अज्ञात ठिकाणी घेऊन गेले, असे फिर्यादीत म्हटले आहे.
या घटनेनंतर उषा शिंदे यांनी २६ एप्रिल २०२५ रोजी बेंबळी पोलीस ठाण्यात धाव घेऊन फिर्याद दिली. पोलिसांनी १० आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता (भा.न्या.सं.) कलम ११५(२) (गैरकायदेशीर जमाव), ३५२ (मारहाण), १३७(२) (अपहरण), १८९(२), १९१(२)(३) (जखमी करणे), १९० (धमकी देणे) अन्वये गुन्हा नोंदवला आहे. अपहृत दिनेश शिंदे आणि आरोपींचा शोध बेंबळी पोलीस घेत आहेत.