धाराशिव – धाराशिव जिल्ह्यात गेल्या काही दिवसांत गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचे चित्र असून, विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीत घरफोडी, पीक चोरी, वाहन चोरी आणि पशुधन चोरीच्या घटना घडल्या आहेत. या घटनांमध्ये लाखो रुपयांचा ऐवज चोरीला गेला असून, संबंधित पोलीस ठाण्यांमध्ये अज्ञात तसेच ज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
कळंबमध्ये लाखोंची घरफोडी:
कळंब तालुक्यातील हासेगाव (केज) येथे मोठी घरफोडी झाली. मच्छिंद्र रामलिंग खरडकर (वय ६० वर्षे) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, २७ एप्रिलच्या रात्री २१.०० ते २८ एप्रिलच्या पहाटे ०२.०० च्या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी त्यांचे व त्यांचे शेजारी लिंबराज प्रल्हाद काळे यांच्या घराचे कडी-कोंडे तोडून आत प्रवेश केला. दोन्ही घरातील लोखंडी कपाटातून एकूण ६१ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम १५,००० रुपये असा एकूण ४,८८,२५८ रुपये किमतीचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला. याप्रकरणी मच्छिंद्र खरडकर यांनी २८ एप्रिल रोजी दिलेल्या तक्रारीवरून कळंब पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या (भा.न्या.सं.) संबंधित कलमांनुसार गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
परंड्यात पीक चोरीवरून दमदाटी:
परंडा तालुक्यातील हिंगणगाव बुद्रुक येथील एका ८० वर्षीय महिलेने पीक चोरी करून दमदाटी केल्याप्रकरणी चौघांविरुद्ध तक्रार दिली आहे. निलावती महादेव ठोंगे (वय ८०) यांच्या फिर्यादीनुसार, ३ मार्च रोजी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास त्यांच्या हिंगणगाव शिवारातील शेतातून आरोपी कल्पना बाबासाहेब ठोंगे, आकाश बाबासाहेब ठोंगे, अभिजीत बाबासाहेब ठोंगे आणि विशाल बाबासाहेब ठोंगे यांनी अंदाजे ३०,००० रुपये किमतीचे ज्वारी व गव्हाचे पीक चोरून नेण्याचा प्रयत्न केला. फिर्यादीने त्यांना अडवले असता, आरोपींनी दमदाटी करून शिवीगाळ केली. या घटनेची तक्रार २८ एप्रिल रोजी परंडा पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली असून, पोलिसांनी भा.न्या.सं. कलमांन्वये गुन्हा नोंदवला आहे.
ढोकी हद्दीत मोटारसायकल आणि म्हशींची चोरी:
ढोकी पोलीस ठाण्याच्या हद्दीत चोरीच्या दोन स्वतंत्र घटनांची नोंद झाली आहे. पहिल्या घटनेत, शाहु विनायक पाडे (वय ४० वर्षे, रा. पिंपरी, ता. कळंब) यांची अंदाजे २५,००० रुपये किमतीची काळ्या रंगाची एचएफ डिलक्स मोटारसायकल (१३ एस, लाल-पांढरे पट्टे असलेली) २४ एप्रिल रोजी रात्री ८.०० ते १०.३० च्या दरम्यान ढोकी येथील सरकारी दवाखान्याजवळील पार्किंगमधून अज्ञात व्यक्तीने चोरून नेली. दुसऱ्या घटनेत, जलाल्लोद्दीन कलीमोद्दीन काझी (वय ४२ वर्षे, रा. ढोकी) यांच्या ढोकी शिवारातील शेतातून २१ एप्रिल रोजी सकाळी ६.२० वाजता अंदाजे ७०,००० रुपये किमतीच्या दोन मुऱ्हा जातीच्या म्हैशी अज्ञात व्यक्तीने चोरून नेल्या.
या दोन्ही प्रकरणी फिर्यादींनी २८ एप्रिल रोजी दिलेल्या तक्रारींवरून ढोकी पोलीस ठाण्यात भा.न्या.सं. कलम ३०३ (२) अन्वये स्वतंत्र गुन्हे नोंदवण्यात आले आहेत.