स्थळ: जिल्हा नियोजन समितीची बैठक, धाराशिव.
वेळ: कामगार दिनाची दुपार.
पात्रं: पालकमंत्री प्रताप सरनाईक (अध्यक्षस्थानी), भाजप आमदार राणा जगजितसिंह पाटील आणि शिवसेना (ठाकरे गट) खासदार ओमराजे निंबाळकर (चुलत भाऊ, पण राजकीय वैरी).
सीन काय होता?
तर झालं असं की, १ मे रोजी धाराशिव जिल्ह्याच्या विकासावर ‘गंभीर’ चर्चा करण्यासाठी सगळे दिग्गज जमले होते. पालकमंत्री सरनाईक साहेबांच्या अध्यक्षतेखाली बैठक सुरू झाली. त्यांच्या एका बाजूला राणादादा पाटील आणि दुसरीकडे (अगदी शेजारी) खासदार ओमराजे निंबाळकर बसले होते. आता हे दोघे चुलत भाऊ असले तरी त्यांच्यात सध्या ३६ चा आकडा आहे, हे सगळ्यांनाच माहितीये.
बैठकीत तसे अनेक विषय होते, पण ओमराजे दोन गोष्टींवर जाम खट्टू होते. एक म्हणजे, तब्बल २६८ कोटींच्या विकासकामांना अचानक मिळालेली स्थगिती आणि दुसरं म्हणजे, तुळजापूरचं गाजलेलं ड्रग्ज प्रकरण. ओमराजेंनी हा ड्रग्जचा मुद्दा लावून धरला होता. “अहो दीड महिना झाला, एक आरोपी अटक नाही? काय चाललंय काय? कुणाचा दबाव आहे पोलिसांवर?” असे सवाल ते विचारत होते.
आणि मग निघाला ‘बाप’!
आता खरी गंमत पुढेच आहे. ओमराजे ड्रग्ज प्रकरणावर बोलत असताना, कुणीतरी राणा पाटलांच्या एका कार्यकर्त्याने (जो म्हणे ड्रग्ज प्रकरणातील एका आरोपीचा भाऊ आहे) ओमराजेंना डिवचलं. काय? तर म्हणे, “ओमराजेंचा बाप दूध विकत होता!” आता हे ऐकून ओमराजेंच्या तळपायाची आग मस्तकात गेली नसती तरच नवल!
ओमराजेंचा पलटवार: “होय, माझा बाप दूधच विकायचा, ड्रग्ज नाही!”
ओमराजे नुसते संतापले नाहीत, तर त्यांनी भर सभेत जाहीर उत्तर दिलं, “व्हय! माझा बाप दूधच विकत होता आणि मला त्याचा अभिमान आहे! ड्रग्ज तर विकत नव्हता ना?” या एका वाक्याने बैठकीत क्षणभर शांतता पसरली आणि मग कुजबुज सुरू झाली. ओमराजे इथेच थांबले नाहीत, त्यांनी पुढे आव्हानच दिलं, “माझे कॉल रेकॉर्ड तपासा आणि या ड्रग्ज प्रकरणातल्या संशयितांचे पण तपासा!” (आता हा इशारा कुणाकडे होता, हे वेगळं सांगायला नको!)
तात्पर्य:
धाराशिवच्या नियोजन बैठकीत विकासाच्या नियोजनापेक्षा राजकीय टोलेबाजी आणि ‘बाप’ काढण्याचंच नियोजन जास्त रंगलेलं दिसलं. एका बाजूला दुधाचा अभिमान होता, तर दुसरीकडे ड्रग्जच्या प्रकरणावरून संशयाचे धुके! आता पुढे काय होतंय, हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल!
Video