धाराशिव – धाराशिव जिल्ह्यात शनिवारी एकाच दिवशी भूम आणि उमरगा तालुक्यात वेगवेगळ्या ठिकाणी बंद घरांना लक्ष्य करत घरफोड्या झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत. दिवसाढवळ्या आणि मध्यरात्रीनंतर झालेल्या या चोऱ्यांमध्ये अज्ञात चोरट्यांनी सोन्या-चांदीचे दागिने व रोख रक्कम असा एकूण २ लाख ३३ हजार रुपयांपेक्षा जास्त किमतीचा मुद्देमाल लंपास केला आहे. या घटनांमुळे संबंधित भागातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून, पोलिसांसमोर चोरट्यांना शोधण्याचे आव्हान आहे.
भूम तालुक्यात दिवसा घरफोडी:
पहिली घटना भूम तालुक्यातील घाटनांदूर येथे घडली. येथील रहिवासी युवराज तात्या बोरगळ (वय २६) हे कामानिमित्त घराबाहेर गेले होते. शनिवारी (दि. ३ मे) सकाळी साडेदहा ते दुपारी अडीच वाजण्याच्या दरम्यान अज्ञात चोरट्याने त्यांच्या बंद घराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. चोरट्याने घरातील पेटीत ठेवलेले १० ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने आणि २० हजार रुपये रोख रक्कम असा एकूण ७० हजार रुपयांचा माल चोरून नेला. याप्रकरणी युवराज बोरगळ यांनी वाशी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून, पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम ३३१ (३) आणि ३०५(अ) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
उमरगा तालुक्यात मध्यरात्री अनेक घरे फोडली:
दुसरी घटना उमरगा तालुक्यातील नाईकनगर तांडा येथे घडली. येथे शनिवारी मध्यरात्रीनंतर चोरट्यांनी धुमाकूळ घातला. पहाटे १ ते ५ वाजण्याच्या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी तांड्यातील रेखा सागर राठोड (वय २८), आप्पीबाई राठोड, रुपचंद चव्हाण, गणपत राठोड आणि हुसेन नदाफ यांच्या घरांची कुलपे एकापाठोपाठ एक तोडून आत प्रवेश केला. चोरट्यांनी घरातील कपाटांमध्ये ठेवलेले एकूण ५५ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने आणि काही चांदीचे दागिने असा मिळून एकूण १ लाख ६३ हजार ६३० रुपयांचा ऐवज चोरून नेला. याप्रकरणी रेखा राठोड यांनी मुरुम पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम ३३१ (४) आणि ३०५ अन्वये गुन्हा नोंदवून तपासाला सुरुवात केली आहे.
एकाच दिवशी जिल्ह्यात दोन मोठ्या घरफोडीच्या घटना घडल्याने पोलीस यंत्रणा सतर्क झाली असून, वाशी आणि मुरुम पोलीस आपापल्या हद्दीतील गुन्ह्यांचा तपास करत आहेत.