उमरगा – उमरगा तालुक्यातील नारंगवाडी येथे एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. नातेवाईक कामावर आला नाही, या क्षुल्लक कारणावरून एका महिलेला आणि तिच्या मुलीला सात जणांनी मिळून मारहाण केल्याची घटना घडली आहे. या मारहाणीत चाकूचा वापर करण्यात आला असून, जीवे मारण्याची धमकीही देण्यात आली आहे. याप्रकरणी पीडित महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून सात आरोपींविरुद्ध उमरगा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी मीना किसन दलाले (वय ३५ वर्षे, मूळ रा. मंठाळ, ता. बसवकल्याण, ह.मु. नारंगवाडी, ता. उमरगा) यांच्या बहिणीचा मुलगा शिवम भरत कांबळे हा नारंगवाडी येथील प्राची हॉटेल ढाब्यावर कामाला आहे. दिनांक ४ मे २०२५ रोजी तो कामावर गेला नव्हता. याचा राग मनात धरून आरोपी अमोल केरनाथ कांबळे, विकी केरनाथ कांबळे, केरनाथ कांबळे, बबलु, यश संजय कांबळे, सरोजा संजय कांबळे आणि अमोलची पत्नी (सर्व रा. नारंगवाडी, ता. उमरगा) यांनी त्याच दिवशी सकाळी सुमारे १०:३० वाजता फिर्यादी मीना दलाले यांच्या घरी येऊन गैरकायदेशीर जमाव जमवला.
आरोपींनी शिवम कामावर का आला नाही, याचा जाब विचारत मीना दलाले आणि त्यांची मुलगी दिपाली यांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. त्यानंतर आरोपींनी माय-लेकीला लाथाबुक्क्यांनी, काठीने मारहाण केली. एवढ्यावरच न थांबता आरोपींनी चाकूने वार करून त्यांना जखमी केले आणि जिवे ठार मारण्याची धमकी दिली.
या घटनेनंतर मीना दलाले यांनी तात्काळ उमरगा पोलीस ठाणे गाठून आरोपींविरुद्ध फिर्याद दिली. त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी सातही आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम ११८(१) (गैरकायदेशीर जमाव), ११५(२) (गुन्ह्यास चिथावणी देणे), ३५२ (मारहाण), ३५१(२), ३५१(३) (धमकी देणे), १८९(२) (दंगल घडवणे), १९१(२), १९१(३) (दुखापत करणे), १९० अन्वये गुन्हा नोंदवला आहे. उमरगा पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.