तामलवाडी – तुळजापूर येथील गाजत असलेल्या ड्रग्ज प्रकरणात तामलवाडी पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी घटना समोर आली आहे. या प्रकरणातील एका फरार आरोपीचा भाऊ चक्क सहाय्यक पोलीस निरीक्षकाच्या केबिनमध्ये गप्पा मारताना आढळल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकारानंतर पोलिसांनी आरोपींना व्हीआयपी ट्रीटमेंट देत असल्याचा गंभीर आरोप सामाजिक कार्यकर्त्याने केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, तुळजापूर ड्रग्ज प्रकरणात एकूण ३६ आरोपी असून, त्यापैकी १५ जणांना अटक करण्यात आली आहे. यातील १४ जण सध्या न्यायालयीन कोठडीत असून, रणजित पाटील नावाचा आरोपी नुकताच अटकेत आहे. या प्रकरणातील एक आरोपी विनोद गंगणे हा अजूनही फरार आहे.
आज (दि. ५ मे) सायंकाळी सुमारे ५:३७ वाजता, फरार आरोपी विनोद गंगणे याचा भाऊ विजय गंगणे हा तामलवाडी पोलीस स्टेशनमध्ये सहाय्यक पोलीस निरीक्षक गोकुळ ठाकूर यांच्या केबिनमध्ये बसून त्यांच्याशी गप्पा मारत होता. ही बाब सामाजिक कार्यकर्ते राजाभाऊ माने यांच्या निदर्शनास आली. त्यांनी तात्काळ सपोनि ठाकूर यांना फोन करून याबाबत विचारणा केली.
राजाभाऊ माने यांनी आरोप केला आहे की, सध्या अटकेत असलेल्या रणजित पाटील हा विजय गंगणे यांचा कार्यकर्ता आहे. जर रणजित पाटील यांचे कॉल डिटेल्स रेकॉर्ड (सीडीआर) तपासले, तर विजय गंगणे हा देखील या प्रकरणात आरोपी होऊ शकतो. पोलीस ठाण्यात एका फरार आरोपीच्या भावाला अशा प्रकारे सहज प्रवेश मिळणे आणि अधिकाऱ्यासोबत गप्पा मारताना दिसणे, हे पोलीस आरोपींना किंवा त्यांच्या संबंधित लोकांना व्हीआयपी ट्रीटमेंट देत असल्याचे दर्शवते, असा दावा माने यांनी केला आहे.
विजय गंगणे हा नेहमीच तामलवाडी पोलीस स्टेशनमध्ये असतो, त्यांचे नेमके काय काम असते ? पोलिसांशी डील करायला येतो का ? असा सवालही माने यांनी विचारला आहे.
माने यांनी पोलीस स्टेशनमधील आजच्या दिवसाचे सीसीटीव्ही फुटेज तपासण्याची आणि या प्रकरणात सपोनि गोकुळ ठाकूर यांच्यावर योग्य ती कारवाई करण्याची मागणी केली आहे. या घटनेमुळे तुळजापूर ड्रग्ज प्रकरणाच्या तपासावर आणि पोलिसांच्या निःपक्षपातीपणावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.