मुरुम – धाराशिव जिल्ह्यातील मुरुम पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका ४० वर्षीय रिक्षाचालकाला, “तुमच्या खानदानामुळे आम्हाला वाईट दिवस आले आहेत,” असे म्हणत तिघांनी रिक्षा अडवून जीवघेणा हल्ला केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. या हल्ल्यात कोयता, लोखंडी पाते असलेले हत्यार आणि दगडाने मारहाण करून रिक्षाचालकाला गंभीर जखमी करण्यात आले. ही घटना ४ मे रोजी रात्री घडली असून, याप्रकरणी मुरुम पोलिसांनी ५ मे रोजी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
या हल्ल्यात मिलींद शरणु कांबळे (वय ४० वर्षे, रा. कोथळी, ता. उमरगा, जि. धाराशिव) हे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून, परमेश्वर विठ्ठल गुंडरगे, अभि रुपचंद मंडले आणि अविनाश तुळशीराम फिरंगे (सर्व रा. कोथळी, ता. उमरगा) यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मिलींद कांबळे हे ४ मे २०२५ रोजी रात्री सुमारे साडेदहा वाजता मुरुम मोडकडून मुरुमकडे जाणाऱ्या रस्त्यावर एम.एस.ई.बी. पॉवर हाऊसजवळून आपल्या रिक्षाने जात होते. यावेळी आरोपींनी त्यांची रिक्षा अडवली. “तुमच्या खानदानामुळे आम्हाला वाईट दिवस आले आहेत,” असे म्हणत आरोपींनी कांबळे यांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली आणि जीवे मारण्याची धमकी दिली. त्यानंतर, आरोपींनी त्यांना लाथाबुक्यांनी, तसेच कोयता, लोखंडी पात्याचे हत्यार आणि दगडाने बेदम मारहाण केली. या हल्ल्यात कांबळे गंभीर जखमी झाले.
घटनेनंतर मिलींद कांबळे यांनी ५ मे २०२५ रोजी मुरुम पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी तिन्ही आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम १०९, १२६(२), ३५१(२), ३५१(३) आणि ३(५) अन्वये गुन्हा नोंदवला आहे. मुरुम पोलीस पुढील तपास करत असून आरोपींचा शोध सुरू आहे.