चिखली – मौजे चिखली (ता. जि. धाराशिव) येथील जिल्हा परिषदेच्या लघु पाटबंधारे विभागाच्या मालकीच्या पाझर तलाव क्रमांक १ मधून डी. सी. अजमेरा नामक ठेकेदाराकडून मोठ्या प्रमाणात अवैध मुरुम उपसा करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. विशेष म्हणजे, हा प्रकार एक महिनाभर सुरू होता आणि यामुळे गावाच्या सार्वजनिक पाणीपुरवठा योजनेच्या पाईपलाईनचे प्रचंड नुकसान झाले आहे. या गंभीर प्रकाराबाबत ग्रामस्थांमधून तीव्र संताप व्यक्त होत असून, चिखली ग्रामपंचायतीने एका पत्राद्वारे तहसीलदारांकडे धाव घेत संबंधित ठेकेदारावर कठोर कारवाई करण्याची जोरदार मागणी केली आहे.
ग्रामपंचायतीने तहसीलदारांना सादर केलेल्या निवेदनानुसार, डी. सी. अजमेरा कॉन्ट्रॅक्टरच्या वाहनांद्वारे पाझर तलाव क्रमांक १ मधून मागील महिनाभरापासून बेसुमार मुरुम उपसा सुरू होता. या अंधाधुंद उपशामुळे केवळ शासकीय मालमत्तेचेच नव्हे, तर ग्रामपंचायतीच्या अखत्यारीतील सार्वजनिक पाणीपुरवठा योजनेच्या नळ पाईपलाईनची अक्षरशः दुरवस्था झाली आहे. यामुळे गावातील पाणीपुरवठ्यावर परिणाम होण्याची भीती व्यक्त होत आहे. गावातून या मुरुम उपशाबाबत सातत्याने तक्रारी येत असल्याचेही ग्रामपंचायतीने आपल्या पत्रात नमूद केले आहे.
सरपंच श्रीमती वृंदावनी शाम जाधवर आणि ग्रामसेवक जे. डी. भोसले यांच्या सहीनिशी तहसीलदारांना देण्यात आलेल्या या पत्रात, मुरुम उपसा करणाऱ्या ठेकेदारावर तातडीने योग्य ती कायदेशीर कारवाई करून होणारे नुकसान थांबवावे आणि दोषींना जबाबदार धरावे, अशी नम्र विनंती करण्यात आली आहे.
एका बाजूला शासन ‘एक कदम स्वच्छते की ओर’ यासारख्या घोषणा देत असताना, दुसरीकडे नैसर्गिक संसाधनांची आणि सार्वजनिक मालमत्तेची अशा प्रकारे लूट होत असेल, तर प्रशासनाच्या कार्यक्षमतेवरच प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. या बेकायदेशीर मुरुम उपशामुळे पर्यावरणाची हानी तर होतेच, शिवाय शासनाचा महसूलही बुडतो. आता प्रशासन या गंभीर तक्रारीची दखल घेऊन संबंधित ठेकेदारावर काय कारवाई करते, याकडे चिखली परिसरातील ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे. अशा प्रकारांना वेळीच आळा न घातल्यास भविष्यात शासकीय मालमत्ता आणि पर्यावरणाचे मोठे नुकसान होण्याची भीतीही व्यक्त केली जात आहे.
धाराशिव ते औसा या रस्त्याचे दुरुस्तीचे काम संबंधित गुत्तेदार करत आहेत. कमी उपसा दाखवून बेसुमार उपसा केल्याचं ग्रामपंचायतने सांगितलं आहे. यामुळे शासनाची रॉयल्टी बुडवून शासकीय नुकसान केल्याची तक्रार ग्रामसेवक व सरपंच यांनी केली आहे. तरी अजूनही तहसीलदार यांनी कोणतीही कारवाई केलेली नाही. गुत्तेदार व तहसील कार्यालय यांच्यात मिलिभगत आहे का असा सवाल ग्रामपंचायत चिखली कडून विचारला जात आहे.