धाराशिव: शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केल्यास २० टक्के नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवून एका व्यक्तीने ६ लाख ४० हजार रुपयांचा अपहार करून फसवणूक केल्याची घटना धाराशिव शहरात उघडकीस आली आहे. याप्रकरणी राहुल किसन कुंभार (रा. आरवडे, ता. तासगाव, जि. सांगली) याच्याविरुद्ध आनंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी अक्षय माधव मुंढे (वय २९ वर्षे, रा. विकास नगर, तेरणा कॉलेज समोर, धाराशिव) आणि त्यांच्या मित्रांचा विश्वास संपादन करून आरोपी राहुल कुंभार याने ही फसवणूक केली. १२ नोव्हेंबर २०२३ रोजी सकाळी १० वाजल्यापासून ते आजपर्यंतच्या काळात समता कॉलनी, धाराशिव येथे हा प्रकार घडल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
आरोपी कुंभार याने मुंढे आणि त्यांच्या मित्रांना शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवल्यास चांगला परतावा मिळवून देण्याचे आमिष दाखवले. त्यांच्याकडून एकूण ६ लाख ४० हजार रुपये घेतले, मात्र कोणताही नफा न देता किंवा मूळ रक्कमही परत न करता त्यांचा अपहार केला.
फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर अक्षय मुंढे यांनी १० मे २०२५ रोजी आनंदनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी राहुल किसन कुंभार याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम ३१६(२) (फसवणूक) आणि ३१८(४) (गुन्हेगारी विश्वासघात) अन्वये गुन्हा नोंदवला आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.