धाराशिव – कत्तलीच्या उद्देशाने गोवंशाची अत्यंत निर्दयपणे वाहतूक करणाऱ्या एका व्यक्तीविरुद्ध ढोकी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. ही घटना गुरुवारी, १५ मे २०२५ रोजी दुपारी दीडच्या सुमारास ढोकी ते तडवळा जाणाऱ्या रस्त्यावर घडली. या कारवाईत ९४,००० रुपये किमतीची तीन जर्सी गायी आणि तीन वासरे जप्त करण्यात आली आहेत.
याबाबत ढोकी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी वाजीद सलीम पठाण (वय २५ वर्षे, रा. खिरणी मळा, धाराशिव ता. जि. धाराशिव) हा अशोक लेलँड दोस्त गाडी क्रमांक एमएच १३ बीक्यू ०७२६ मधून गोवंशीय जनावरांची वाहतूक करत होता. ढोकी ते तडवळा जाणाऱ्या रोडवर मोठ्या पुलाच्या पुढे पोलिसांना ही गाडी संशयास्पदरीत्या आढळून आली.
गाडीची तपासणी केली असता, त्यामध्ये तीन जर्सी गायी आणि तीन जर्सी गायींची वासरे अत्यंत निर्दयतेने कोंबून भरलेली होती. जनावरांसाठी चारा-पाण्याची कोणतीही व्यवस्था गाडीत नव्हती. ही जनावरे कत्तलीसाठी बेकायदेशीररीत्या नेली जात असल्याचे स्पष्ट झाले. जप्त केलेल्या जनावरांची एकूण किंमत ९४,००० रुपये आहे.
याप्रकरणी, ढोकी पोलिसांनी सरकारतर्फे फिर्याद देऊन आरोपी वाजीद सलीम पठाण याच्याविरुद्ध महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियमाचे कलम ५(अ), ५(ब), महाराष्ट्र पोलीस कायद्याचे (मपोका) कलम ११९, तसेच प्राण्यांना क्रूरतेने वागवण्यास प्रतिबंध अधिनियमाचे कलम ११(१), ११(१) (ए), (एफ), (एच), (डी), (आय) आणि जनावरांचा वाहतूक नियमांचे कलम ४७, ४८, ५०, ५३ सह मोटार वाहन कायद्याचे कलम १५८/१७७ अन्वये गुन्हा नोंदवला आहे. पुढील तपास ढोकी पोलीस करत आहेत.