धाराशिव: भारतीय लष्कराने राबवलेल्या “ऑपरेशन सिंदूर” मोहिमेनंतर दहशतवादी संघटनांकडून संभाव्य ड्रोन हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर धाराशिव जिल्ह्यात ३ जून २०२५ पर्यंत ‘नो फ्लाइंग झोन’ (No Flying Zone) घोषित करण्यात आला आहे. अपर जिल्हादंडाधिकारी शोभा जाधव यांनी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ च्या कलम १६३ नुसार प्राप्त अधिकारांचा वापर करून हे आदेश जारी केले आहेत. या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे.
भारतीय लष्कराने ऑपरेशन ‘सिंदुर’ अंतर्गत देशविघातक संघटनांचे – जैश-ए-मोहम्मद (JEM), लष्कर-ए-तय्यबा (LET) आणि हिजबुल मुजाहिदीन (HM) – तळ उद्ध्वस्त केले असून,या कारवाईचा सूड घेण्यासाठी दहशतवादी संघटनांनी ड्रोनद्वारे हल्ल्यांची शक्यता वर्तवली आहे. या गंभीर धोक्याच्या पार्श्वभूमीवर आणि जिल्ह्याच्या सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून हा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे.
या आदेशानुसार, ३ जून २०२५ पर्यंत संपूर्ण धाराशिव जिल्ह्यात कोणत्याही प्रकारचे ड्रोन, रिमोट नियंत्रित मायक्रो एअरक्राफ्ट, पॅरा ग्लायडर्स, हँग ग्लायडर्स, हॉट एअर बलून आणि तत्सम कोणतीही हवेत तरंगणारी वस्तू उडवण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न आणि सुरक्षाविषयक तातडीची गरज लक्षात घेता, सर्व संबंधितांना नोटीस देऊन आदेश काढण्यास पुरेसा अवधी नसल्याने हा एकतर्फी आदेश काढण्यात आल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्ती, संस्था किंवा संघटनांवर भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम २२३ अन्वये कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशाराही प्रशासनाकडून देण्यात आला आहे. नागरिकांनी या आदेशाचे पालन करून प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.