धाराशिव – धाराशिव शहरातील मारुती इटलकर खून प्रकरणाचा तपास पोलिसांकडून काढून गुन्हे अन्वेषण विभागाकडे (सीआयडी) सोपवण्यात यावा, मुख्य आरोपीसह सर्व फरार आरोपींना तात्काळ अटक करावी आणि संबंधित पोलीस अधिकाऱ्यांच्या मोबाईलचे कॉल डिटेल्स रेकॉर्ड (सीडीआर) तपासण्यात यावेत, अशी मागणी मयत मारुतीच्या कुटुंबीयांनी केली आहे. आपल्या मुलीच्या छेडछाडीचा जाब विचारल्याच्या रागातून मारुतीची हत्या करण्यात आल्याचा आरोप करत, या प्रकरणी धाराशिव शहर पोलिसांच्या भूमिकेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित करत पीडित कुटुंबाने जिल्हाधिकाऱ्यांमार्फत १९ मे रोजी मुख्यमंत्र्यांना निवेदन सादर केले आहे.
निवेदनात म्हटले आहे की, ८ मे रोजी धाराशिव शहरातील जुन्या गल्लीत सागर चौधरी हा शिवाजी इटलकर यांच्या मुलीची छेड काढत होता. याचा जाब मारुती इटलकर याने विचारला असता, रणजीत चौधरी यांच्या सांगण्यावरून सागर चौधरी, प्रवीण चौधरी, किशोर चौधरी, अंकुश चौधरी आणि सिद्धनाथ सावंत यांनी संगनमत करून मारुतीला काठीने अमानुष मारहाण केली. या मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या मारुतीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
कुटुंबीयांचा आरोप आहे की, धाराशिव शहर पोलिसांनी तक्रार घेण्यास सुरुवातीला दिरंगाई केली आणि घटना घडल्यापासून तीन दिवसांपर्यंत आरोपींना अटक केली नाही. मात्र, मारुतीचे प्रेत पोलीस अधीक्षक कार्यालयात आणल्यानंतर पोलिसांनी काही क्षणात आरोपींना कसे पकडले? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.
इतकेच नव्हे तर, पोलिसांनी आरोपींशी संगनमत करून मयत मारुतीचे वडील शिवाजी इटलकर यांच्यावरच खोटा गुन्हा दाखल केल्याचा गंभीर आरोपही कुटुंबीयांनी केला आहे. ज्या मुलीची छेड काढण्यात आली, त्या पीडित मुलीला शहर पोलीस ठाण्याच्या पुरुष पोलिसाने घटनास्थळी नेऊन दबाव टाकत लज्जास्पद वागणूक दिली. वास्तविक पाहता, ही विचारपूस महिला पोलिसांनी करणे बंधनकारक असताना तसे का केले गेले नाही, असा प्रश्नही उपस्थित करण्यात आला आहे.
घटनेपासून शहर पोलीस ठाण्याचे संबंधित अधिकारी आरोपींना वाचवण्यासाठी कोणाच्या संपर्कात होते आणि पोलिसांवर कोणता राजकीय दबाव आहे, याचीही चौकशी व्हावी, अशी मागणी करण्यात आली आहे. मुख्य आरोपीसह इतर फरार आरोपी अद्याप मोकाट असल्याने या प्रकरणाचा तपास सीआयडीकडे वर्ग करून, सर्व आरोपींना तात्काळ अटक करावी व संबंधित पोलीस अधिकाऱ्यांचे सीडीआर तपासावेत, अशी आर्त मागणी पीडित इटलकर कुटुंबाने केली आहे.
या निवेदनावर मयताचे वडील शिवाजी शिमप्पा इटलकर, आई आशा इटलकर, तसेच विजय चौगुले, पंडित चौगुले, महादेव इटलकर, सिमप्पा इटलकर, पूजा इटलकर, आरती इटलकर, तनुजा इटलकर, सुमनबाई इटलकर आणि राधा इटलकर यांच्या सह्या आहेत. या प्रकरणामुळे धाराशिव शहरात हळहळ व्यक्त होत असून, पोलिसांच्या तपासाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.