तुळजापूर: तुळजाभवानी मंदिरात गैरवर्तन आणि तोडफोड केल्याप्रकरणी पुजारी अण्णा कदम यांच्यावर मंदिर संस्थानाने तीन वर्षांसाठी मंदिर प्रवेशबंदीची कठोर कारवाई केली आहे. १३ मे रोजी मद्यधुंद अवस्थेत मंदिर कार्यालयात तोडफोड केल्याच्या घटनेनंतर ही कारवाई करण्यात आली. कदम यांनी मंदिर प्रशासनाने बजावलेल्या नोटीशीला मुदतीत उत्तर न दिल्याने ही कारवाई करण्यात आल्याचे संस्थानच्या वतीने सांगण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पुजारी कदम यांनी यापूर्वीही मंदिरात अनेकदा गैरवर्तन केले होते. १३ एप्रिल रोजी त्यांनी तुळजाभवानी मंदिरात सुरक्षा रक्षकांना धक्काबुक्की आणि शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली होती. त्यानंतर १५ एप्रिल रोजी मंदिर कार्यालयात अप्पर जिल्हाधिकारी आणि व्यवस्थापक तहसीलदारांशी अर्वाच्य भाषेत हुज्जत घातली होती. या गंभीर प्रकारानंतरही महिनाभर त्यांच्यावर कोणतीही कारवाई न झाल्याने आश्चर्य व्यक्त केले जात होते.
१३ मे रोजी कदम यांनी मद्यधुंद अवस्थेत मंदिर कार्यालयात तोडफोड केली. या प्रकरणी त्यांच्याविरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. मंदिर संस्थानाने त्यांना देऊळ कवायतीनुसार मंदिर बंदी का करू नये, अशी विचारणा करणारी नोटीस बजावली होती आणि १६ मे पर्यंत खुलासा सादर करण्यास सांगितले होते. मात्र, कदम यांनी मुदतीत खुलासा सादर न केल्याने अखेर त्यांच्यावर देऊळ कवायत कायद्याच्या कलम २४ व २५ अन्वये पुढील तीन वर्षांसाठी मंदिर प्रवेशबंदीची कारवाई करण्यात आली.
मंदिर संस्थानाने आपल्या आदेशात म्हटले आहे की, सुरक्षा रक्षकांशी वाद घालणे, शिवीगाळ करणे, धक्काबुक्की करणे आणि तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या मालमत्तेचे नुकसान करणे हे वर्तन अतिशय गंभीर स्वरूपाचे असून पुजारी व्यवसायाला न शोभणारे आहे. त्यामुळे ही कडक कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईमुळे मंदिर परिसरातील शिस्त आणि पावित्र्य राखण्यास मदत होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.