धाराशिव: शिंदे गटात सामील न झाल्याने आणि एका गुन्ह्यात साक्षीदार झाल्याच्या कारणावरून एका ४२ वर्षीय ठाकरे गटाच्या कार्यकर्त्याला चार जणांनी मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार समोर आला आहे. ही घटना २३ मे २०२५ रोजी दुपारी ३ वाजून ५० मिनिटांनी संभाजीनगर काकडे प्लॉट येथील सुधीर बंडगर यांच्या घरासमोर घडली. याप्रकरणी आनंदनगर पोलीस ठाण्यात चार आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता (बीएनएस) अंतर्गत विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी – शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे गट ) शहर संघटक प्रशांत उर्फ बापू बिभीषण साळुंके (वय ४२, व्यवसाय शेती, रा. बाळासाहेब ठाकरे नगर, धाराशिव) हे २३ मे रोजी दुपारी तहसील कार्यालयात कामासाठी त्यांच्या स्कुटीवरून निघाले होते. संभाजीनगर काकडे प्लॉट येथील सुधीर बंडगर यांच्या घरासमोर आले असता, सुदर्शन उर्फ विशाल आण्णा गाढवे (रा. वरुडा, धाराशिव), विनोद उर्फ अमोल विलास जाधव (रा. नारायण कॉलनी, धाराशिव) आणि इतर दोन अनोळखी इसमांनी त्यांची स्कुटी थांबवली.
आरोपींनी साळुंके यांना “तुला सुधीर आण्णा पाटील यांनी दिलेला निरोप समजला नाही का?” आणि “संदेश जाधव याच्यावर दाखल झालेल्या गुन्ह्यात तू साक्षीदार का झालास व तू शिंदे गटात का येत नाहीस, तुला लई माज आला आहे का, तुला खल्लास करून टाकू” असे म्हणून शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. साळुंके यांनी हा आपल्या मर्जीचा प्रश्न असल्याचे सांगताच, विनोद जाधवने त्यांच्या गळ्याला धरून मारहाण केली आणि त्याच्यासोबत असलेल्या दोघांनीही लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.
यावेळी सुदर्शन उर्फ विशाल गाढवे याने त्याच्या हातातील लोखंडी रॉडने साळुंके यांच्या उजव्या पायाच्या गुडघ्यावर जोरात मारले, ज्यामुळे ते खाली पडले. त्यानंतर चौघांनी पुन्हा लाथाबुक्क्यांनी मारहाण करत त्यांचा गळा दाबण्याचा प्रयत्न केला. साळुंके यांनी जोरात ओरडल्याने दत्ता सोकांडे, युवराज राठोड व इतर लोक घटनास्थळी आले. त्यामुळे आरोपी पळून गेले, जाताना त्यांनी “तू आता तर वाचलास, यानंतर तुला जिवंत ठेवणार नाही, तु जर शिंदे गटात प्रवेश केलास तरंच तुला जगू देवू” अशी धमकी दिली.
यानंतर दत्ता सोकांडे व इतरांनी साळुंके यांना आनंदनगर पोलीस ठाण्यात नेले. उजव्या पायाला मार लागल्याने त्यांना उपचारासाठी प्रथम शासकीय रुग्णालयात व नंतर क्रांती मल्टीस्पेशालिटी रुग्णालयात दाखल करण्यात आले. साळुंके यांनी दिलेल्या जबाबानुसार, त्यांच्या गळ्यातील सोन्याची चैन गायब झाली असून, ती घरी ठेवली आहे की आरोपींनी काढून घेतली आहे, याबाबत खात्री करून नंतर कळवणार असल्याचे म्हटले आहे.
आनंदनगर पोलिसांनी याप्रकरणी २४ मे २०२५ रोजी रात्री १० वाजून ५५ मिनिटांनी FIR (क्र. ०१९८) नोंदवला आहे. आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता (बीएनएस), २०२३ अंतर्गत कलम ११८(१), ११५(२), १२६(२), ३५२, ३५१(२), ३५१(३), आणि ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक (Asst. SI) सतीश गोविंद घांटे करत आहेत.