काय म्हणे प्रगती? काय म्हणे २१ वं शतक? धाराशिव जिल्ह्यातलं गावसूद नावाचं गाव मात्र अजूनही भूतकाळातच रमलंय, अन् तेही बालविवाहाच्या काळोख्या भूतकाळात! जिथं पोरीबाळींच्या हाती पाटी-पेन्सिलऐवजी थेट संसाराचं जोखड दिलं जातंय, तिथं प्रगतीच्या गप्पा हवेतच विरून जातात राव!
‘लेटेस्ट एपिसोड’: अल्पवयीन अक्षता!
ताजं ‘उदहारण’ म्हणजे गवसूदमध्ये झालेला बालविवाह, मुलीचे वय १६ ( जन्मतारीख ९ मे २०१०!) तर मुलाचे वय वय १८. म्हणजे काय, तर वधूपक्ष आणि वरपक्ष दोघंही कायद्याच्या भाषेत ‘बच्चा पार्टी’! पण इथं कायद्याला कोण विचारतोय? हळदीचे आणि लग्नाचे फोटो-व्हिडीओ तर सोशल मीडियावर असे काही व्हायरल झालेत, जणू काही ऑलिम्पिक मेडलच जिंकलंय! विशेष म्हणजे, दोन आठवड्यातला हा तिसरा बालविवाह ठरता ठरता राहिला, यातला एक तर ऐन मांडवातून महिला व बालविकास विभागाने उचलला होता म्हणे!
सरकारी ‘कोमा’? अधिकारी गप्प, कायदा सुस्त!
अहो, हे सगळं घडत असताना गावाचे ‘कर्तेधर्ते’ ग्रामसेवक, जिल्ह्याचे बाल विकास प्रकल्प अधिकारी, ज्यांच्यावर “बाल विवाह प्रतिबंधक अधिनियम २००६” ची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी आहे, ते काय करत होते? सरपंच, अंगणवाडी ताई, ज्यांनी गावपातळीवर हे रोखायला हवं, त्यांची तोंडून ‘ब्र’ ही नाही! म्हणजे, कायदा फक्त कागदावर नाचवायचा आणि प्रत्यक्षात बालविवाहांच्या तालावर गाव नाचवायचं, असंच काहीसं चित्र दिसतंय. सूत्रांनी तर याच कुटुंबातील मोठ्या मुलाचाही बालविवाह पाच महिन्यांपूर्वी डोंबिवलीत झाल्याचा गौप्यस्फोट केलाय. म्हणजे ही तर ‘परंपरा’च दिसतेय!
कायद्याचा धाक की फक्त नावापुरता धाक?
- बालविवाह म्हणजे काय? जिथं नवरा किंवा नवरीपैकी कुणी एक जरी १८ (मुलगी) किंवा २१ (मुलगा) वर्षांपेक्षा कमी वयाचं असेल, तो विवाह.
- शिक्षा काय? प्रौढ पुरुषाने बालविवाह केल्यास २ वर्षांपर्यंत सश्रम कारावास किंवा १ लाख रुपये दंड, किंवा दोन्ही! हा विवाह लावणाऱ्यांनाही तुरुंगवारीची हवा!
- जबाबदार कोण? ग्रामसेवक, बालविकास प्रकल्प अधिकारी हेच बालविवाह प्रतिबंधक अधिकारी! त्यांना मदत करण्यासाठी अंगणवाडी ताई आणि बाल संरक्षण समिती.
धाराशिवचा महिला व बालविकास विभाग झोपलाय का?
हे सगळं बघता, जिल्हा महिला व बालविकास विभाग नक्की काय दिवे लावतोय, असा संतप्त सवाल कुणाच्याही मनात येईल. बालविवाहामुळे मुला-मुलींचं शिक्षण थांबतं, लैंगिक शोषण होतं, बालमाता जन्माला येतात, घटस्फोट वाढतात आणि एकल मातृत्वाचा भार येतो. या सगळ्या समस्यांना आपणच निमंत्रण देतोय.
आता तरी जागे व्हा!
समाज म्हणून आपण डोळे उघडे ठेवले नाहीत, तर गावसूदसारखी गावं ‘बालविवाहाची पंढरी’ बनायला वेळ लागणार नाही. कुणालाही बालविवाहाची माहिती मिळाल्यास १०९८ या नंबरवर कळवा. तुमचं नाव गुप्त ठेवलं जाईल. नाहीतर हे ‘शुभमंगल’ आपल्या समाजासाठी ‘अशुभ’ ठरल्याशिवाय राहणार नाही, हे नक्की!