धाराशिव: आर्थिक फायदा करून देण्याच्या बहाण्याने दोन अनोळखी इसमांनी एका ७४ वर्षीय वृद्धाला त्यांच्या दोन सोन्याच्या अंगठ्या आणि रोख रक्कम घेऊन फसवल्याची घटना धाराशिव बसस्थानक परिसरात घडली आहे. या प्रकरणी आनंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सुभाष देविदास गणेश (वय ७४ वर्षे, रा. विकास नगर, धाराशिव) यांनी यासंदर्भात फिर्याद दिली आहे. फिर्यादीनुसार, २५ मे २०२५ रोजी दुपारी २ ते ३ वाजण्याच्या सुमारास धाराशिव बसस्थानक परिसरात दोन अनोळखी इसमांनी त्यांना गाठले. या दोघांनी सुभाष गणेश यांचा विश्वास संपादन करत त्यांना आर्थिक फायदा करून देण्याचे आमिष दाखवले.
या आमिषाला बळी पडून गणेश यांनी त्यांच्याजवळील प्रत्येकी पाच ग्रॅम वजनाच्या दोन सोन्याच्या अंगठ्या, ज्यांची अंदाजे किंमत ४०,००० रुपये आहे, आणि २० रुपये रोख त्या अनोळखी इसमांना दिले. मात्र, पैसे आणि दागिने मिळताच त्या दोघांनी गणेश यांची दिशाभूल करून तेथून पळ काढला.
फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर सुभाष गणेश यांनी २७ मे २०२५ रोजी आनंदनगर पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी दोन अनोळखी इसमांविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम ३१८(४) (फसवणूक) आणि ३१६(२) अन्वये गुन्हा नोंदवला आहे. पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत. या घटनेमुळे बसस्थानक परिसरातील प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.