धाराशिव : जिल्हा परिषद धाराशिव अंतर्गत उमरगा येथे कार्यरत असलेले कनिष्ठ अभियंता अश्विन अरुण गोरे यांच्यावर त्यांच्या पहिल्या पत्नीने गंभीर आरोप केले आहेत. पती अश्विन गोरे यांनी कायदेशीर घटस्फोट झालेला नसताना दुसरा विवाह केल्याचा तसेच मारहाण व छळ केल्याचा आरोप करत गायत्री अश्विन गोरे यांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे न्यायाची मागणी केली आहे. याप्रकरणी लातूर आणि औसा पोलीस ठाण्यात वेगवेगळ्या तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, गायत्री अश्विन गोरे यांचा विवाह अश्विन अरुण गोरे यांच्याशी ५ मे २०२१ रोजी रितीरिवाजाप्रमाणे झाला होता. मात्र, गेल्या दोन ते तीन वर्षांपासून अश्विन गोरे हे गायत्री यांना नांदवत नसल्याचे व त्यांच्याविरुद्ध तुळजापूर न्यायालयात घटस्फोटासाठी अर्ज दाखल केल्याचे गायत्री यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे. आपण अत्यंत गरीब घरातील असून अधिकाऱ्याची बायको म्हणून शोभत नाही, असे कारण देत पती नांदवण्यास नकार देत असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. गायत्री यांनी कुटुंबिक न्यायालय, लातूर येथे वैवाहिक संबंध पुनर्स्थापित करण्यासाठी अर्ज दाखल केला आहे.
पुण्यात दुसरा विवाह केल्याचा आरोप आणि त्यानंतरची मारहाण
गायत्री गोरे यांनी दिलेल्या निवेदनानुसार, त्यांचे पती अश्विन गोरे यांनी पहिली पत्नी असतानाही २२ एप्रिल २०२५ रोजी पुणे शहरातील वाकड येथील साई हॉलमध्ये शिल्पा दत्तात्रय सूर्यवंशी नामक महिलेशी दुसरा विवाह केला. याबाबत माहिती मिळाल्यावर विचारणा केली असता, लातूर येथे एका लग्न समारंभात अश्विन गोरे यांनी गायत्री व त्यांच्या भावाला बेदम मारहाण केली. या घटनेप्रकरणी गायत्री यांनी २४ एप्रिल २०२५ रोजी विवेकानंद चौक पोलीस ठाणे, लातूर येथे पती अश्विन गोरे यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम ८२(१) अन्वये मारहाणीची तक्रार (एन.सी.आर. क्रमांक ०५१३/२०२५) दाखल केली आहे.


औसा येथे पुन्हा मारहाण आणि विनयभंगाचा आरोप
यानंतर, १४ मे २०२५ रोजी अश्विन गोरे हे औसा येथील केळगावकर लॉन्स येथे दुसरा विवाह करत असल्याची माहिती मिळाल्याने गायत्री गोरे त्याठिकाणी पोहोचल्या. तेथे पती अश्विन गोरे ( तुळजापूर ), शिल्पा सूर्यवंशी (माकणी थोर ता. निलंगा ) श्रीराम श्रीपती पाटील ( निंबाळा ता. औसा ) , दिगंबर किसनराव चिटकोटे , उत्कर्ष चिटकोटे , दत्तात्रय किसनराव चिटकोटे ( रा. हलगरा ता. निलंगा ) आणि स्वप्नील जगताप ( वाकड, पुणे ) यांनी गैरकायदेशीर जमाव जमवून गायत्री आणि त्यांच्या भावाला मारहाण केल्याचा व विनयभंग केल्याचा आरोप गायत्री यांनी केला आहे. या मारहाणीत गायत्री यांच्या भावाच्या डोळ्याला दुखापत झाली. या घटनेनंतर १५ मे २०२५ रोजी औसा पोलीस ठाण्यात वरील सर्व आरोपींविरुद्ध प्रथम खबर अहवाल (एफ.आय.आर. क्रमांक ०१९२/२०२५) दाखल करण्यात आला आहे. यामध्ये भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम ११८(१) (दंगल), ११५(२) (गैरकायदेशीर जमावाचा सदस्य), ३५२ (मारहाण), १८९(२) (गैरकायदेशीर जमाव जमवणे), १९० (दंगलीसाठी शिक्षा), १९१(२) (प्राणघातक हत्यारांसह दंगल) आणि १९१(३) (लोकसेवक दंगल दडपण्याचा प्रयत्न करत असताना हल्ला) अन्वये गुन्हे नोंदवण्यात आले आहेत.
मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे न्यायाची मागणी
आपल्या निवेदनात गायत्री अश्विन गोरे यांनी जिल्हा परिषद, धाराशिवच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे पती अश्विन गोरे यांच्याविरुद्ध कडक कारवाई करून आपल्याला न्याय देण्याची विनंती केली आहे. एका शासकीय पदावर असलेल्या व्यक्तीने असे बेकायदेशीर कृत्य करणे गंभीर बाब असल्याचे त्यांनी म्हटले आहे. या प्रकरणांमुळे धाराशिव आणि लातूर जिल्ह्यात खळबळ उडाली असून पोलीस पुढील तपास करत आहेत.