धाराशिव – मुंबई येथे विक्रीसाठी नेला जाणारा तब्बल १ लाख ६५ हजार ४०० रुपये किमतीचा गांजा जप्त करण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे. येडशी येथील ट्रॅव्हल पॉईंटवर मध्यरात्री ही कारवाई करण्यात आली असून, पोलिसांनी ८.२७ किलो गांजासह एका व्यक्तीला अटक केली आहे. वसंत भालचंद्र शिंदे असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
पोलीस अधीक्षक श्रीमती रितू खोखर यांनी अमली पदार्थ विक्रेत्यांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले होते. या आदेशानुसार, स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुदर्शन कासार आणि त्यांचे पथक गुरुवारी (दि. १२ जून) मध्यरात्री ००:०५ वाजताच्या सुमारास धाराशिव उपविभागात गस्त घालत होते.
गस्तीदरम्यान, येडशी येथील हॉटेल समाधान समोरील ट्रॅव्हल पॉईंटवर एक व्यक्ती काळ्या रंगाची बॅग घेऊन संशयास्पदरीत्या थांबलेली दिसली. पोलिसांनी त्याला विश्वासात घेऊन चौकशी केली असता, त्याने बॅगेत गांजा असल्याची कबुली दिली. पोलिसांनी तात्काळ ग्रामीण पोलिसांच्या मदतीने पंचनामा करून बॅगेची तपासणी केली असता, त्यात ८.२७ किलो वजनाचा गांजा आढळून आला, ज्याची किंमत १,६५,४०० रुपये आहे.
पोलिसांनी आरोपी वसंत भालचंद्र शिंदे (रा. वाखरवाडी, ता.जि. धाराशिव) याला ताब्यात घेतले. चौकशीत त्याने सांगितले की, तो हा गांजा ढोकी येथून ट्रॅव्हल्सने मुंबईला विक्रीसाठी घेऊन जात होता. आरोपीला जप्त मुद्देमालासह पुढील कारवाईसाठी धाराशिव ग्रामीण पोलीस ठाण्यात हजर करण्यात आले आहे. त्याच्यावर अमली पदार्थ प्रतिबंधक कायद्याच्या (एनडीपीएस) कलम ८(क), २०(ब)(२)(ब) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही यशस्वी कामगिरी पोलीस अधीक्षक श्रीमती रितू खोखर व अपर पोलीस अधीक्षक श्रीमती शफकत आमना यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विनोद इज्जपवार, ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मारुती शेळके, सपोनि सुदर्शन कासार आणि त्यांच्या पथकाने संयुक्तपणे पार पाडली.