अहो, राजकारणात कधी काय होईल, याचा नेम नसतो! एकाच गाडीत बसलेले दोन प्रवासी वेगवेगळ्या स्टेशनवर उतरण्यासाठी कसे भांडतात, याचा उत्तम नमुना सध्या धाराशिव जिल्ह्यात पहायला मिळतोय. एका बाजूला आहेत भाजपचे ‘आयडियाबाज’ आमदार राणा जगजितसिंह पाटील आणि दुसऱ्या बाजूला आहेत शिवसेनेचे (शिंदे गट) ‘करेक्ट कार्यक्रम’ करणारे पालकमंत्री प्रताप सरनाईक. दोघांमधील ‘सामंजस्य’ इतकं वाढलंय की, एकाने कोटींची कामं थांबवली, तर दुसऱ्याने थेट रस्त्याच्या टेंडरलाच ‘ब्रेक’ लावला. पण खरी फिरकी तर आता तुळजापुरात घेतली जात आहे.
आमदारांची ‘आयडिया’, पालकमंत्र्यांची ‘ऍक्शन’!
आमचे लाडके आमदार राणा पाटील हे तुळजापूर तीर्थक्षेत्र विकास आराखड्याचे मोठे प्रवर्तक. जणू काही हा आराखडा म्हणजे त्यांच्या राजकीय कारकिर्दीचा ‘मास्टरपीस’च! पत्रकार परिषदा घेऊन, आराखड्याचे श्रेय स्वतःच्या खिशात घालण्याचा त्यांचा सपाटा सुरू होता. यातच त्यांनी एक भव्य दिव्य स्वप्न पाहिले – १०८ फुटी शिल्पात आई तुळजाभवानी छत्रपती शिवाजी महाराजांना तलवार देताना दाखवायची. व्वा! काय कल्पना! यासाठी त्यांनी मूर्तिकारांकडून आणि जनतेतून ‘आयडिया’ सुद्धा मागवल्या होत्या. जणू काही ‘कौन बनेगा मूर्तिकार’ स्पर्धाच!
पण त्यांच्या या ‘आयडिया’च्या गाडीला पालकमंत्र्यांनी असा काही ‘हॅन्डब्रेक’ लावला की, गाडी जागेवरच थांबली. झालं असं की, आमदारांच्या संकल्पनेतील देवीची मूर्ती होती ‘अष्टभुजा’. झालं! इथंच सगळा खेळ फसला. पुजारी आणि भाविकांनी थेट आक्षेप घेतला, “अहो, आमची आई अष्टभुजा कशी? हे आमच्या परंपरेत बसत नाही!”
पालकमंत्र्यांनी साधला अचूक ‘टायमिंग’
आता इथं पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी मारला सिक्सर! त्यांनी लोकांच्या भावनांचा आदर करत, “अरेरे, हे चुकीचं आहे,” असं म्हणत थेट मंत्रालयात बैठक बोलावली. आणि विशेष म्हणजे, ज्यांच्या ‘आयडिया’वर ही सगळी चर्चा होती, ते आमदार राणा पाटील या महत्त्वाच्या बैठकीला ‘गैरहजर’!
सरनाईकांनी क्षणाचाही विलंब न लावता, “भाविकांच्या भावना महत्त्वाच्या,” असं म्हणत ते वादग्रस्त संकल्प चित्र वेबसाईटवरून ‘गायब’ करण्याचे आदेश दिले. म्हणजे, आयडिया राणा पाटलांची आणि त्यावर ‘करेक्शन’ करून हिरो झाले पालकमंत्री! इतकंच नाही, तर “पुढील सर्व निर्णय इतिहास तज्ञ, पुजारी आणि पुरातत्व विभागाला विचारूनच घ्या,” असंही फर्मान सोडलं. म्हणजे थोडक्यात, ‘तुमची आयडिया तुम्ही तुमच्याकडे ठेवा, आता आम्ही बघतो काय करायचं ते.’
‘मैं हूँ ना!’… पण बैठकीला नाही!
सध्या १८५६ कोटींच्या या भव्य आराखड्याची सूत्रं पूर्णपणे पालकमंत्री सरनाईक यांनी आपल्या हाती घेतली आहेत. लवकरच मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन करण्याचा मानसही त्यांनी जाहीर केलाय. त्यासाठी नुकतीच मंत्रालयात एक जंगी बैठकही पार पडली. पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे, याही बैठकीला आमदार राणा पाटील यांची ‘अनुपस्थिती’ ठळकपणे जाणवली.
एकीकडे पालकमंत्री “साडेतीन वर्षांत प्रकल्प पूर्ण करणार” अशा घोषणा करत असताना, दुसरीकडे ज्यांनी या प्रकल्पासाठी सुरुवातीला सर्वाधिक ‘आयडिया’ लढवल्या, तेच महत्त्वाच्या वेळी गैरहजर राहत आहेत.
आता एवढं सगळं झाल्यावर, राणा पाटलांनी मोठ्या उत्साहाने मागवलेल्या ‘आयडिया’चं पुढे काय होणार? त्या फाईलमध्येच पडून राहणार की त्यावर पालकमंत्री स्वतःची ‘आयडिया’ वापरणार? हे पाहणं मोठं मनोरंजक ठरणार आहे. तोपर्यंत, धाराशिवच्या जनतेने पॉपकॉर्न घेऊन या राजकीय ‘कलगीतुऱ्या’चा आनंद घ्यावा, इतकंच!
– बोरूबहाद्दर