छत्रपती संभाजीनगर: सोन्याच्या झगमगाटात रोज अनेकजण येतात, पण त्या दिवशी त्या दुकानात सोनं स्वतःहून लाजलं असावं. कारण तिथे प्रेमाचं तेज आणि माणुसकीचा ओलावा इतका होता की, त्यापुढे कुठल्याही दागिन्याची किंमत फिकी पडावी. ही गोष्ट आहे ९३ वर्षांच्या आजोबांची, त्यांच्या ७० वर्षांच्या पत्नीची आणि त्यांच्यातील निखळ, निस्वार्थी प्रेमाची, जी पाहून अख्खा महाराष्ट्र गहिवरला आहे.
एक स्वप्न, जे पोटाच्या भुकेपेक्षा मोठं होतं…
आजोबांचं वय ९३. आयुष्यभर माधुकरी मागून, हातावरचं पोट भरत त्यांनी संसार केला. पण मनात एक इच्छा होती, एक स्वप्न होतं – आपल्या पत्नीच्या गळ्यात सोन्याचा दागिना घालायचा. हे स्वप्न त्यांनी अनेक दशकं जपलं. अखेर, आयुष्याच्या सायंकाळी, त्यांनी पिशवीत जमवलेली पुंजी घेतली आणि पत्नीला घेऊन थेट छत्रपती संभाजीनगरमधील ‘वनग्राम’ नावाचं सोन्याचं दुकान गाठलं.
दुकानात पोहोचल्यावर आजोबांनी मंगळसूत्रातील एक डोरलं आणि एक छोटी माळ पसंत केली. बिल झाल्यावर त्यांनी थरथरत्या हाताने पिशवीतून ११०० रुपये काढून दिले. पण पैसे कमी पडत होते. ते पाहून आजोबांनी पुन्हा पिशवीत हात घातला आणि चिल्लर काढायला सुरुवात केली. तेवढ्यात आजीनेही आपल्या पदरातून १०-२० रुपयांच्या काही नोटा काढल्या. हा प्रसंग पाहून दुकानाचे मालक भारावून गेले.
माणुसकीचा झरा, जो आटला नाही…
दुकान मालकाने आजोबांच्या हातातील चिल्लर आणि आजीच्या हातातील नोटा नम्रपणे नाकारल्या. ते म्हणाले, “प्रेम काय असतं, हे आज तुमच्याकडून शिकलो.” त्यांनी तो दागिना घेतला आणि स्वतः न देता, आजोबांना त्यांच्या पत्नीच्या गळ्यात घालण्यास सांगितले. तो क्षण कॅमेऱ्यात कैद झाला आणि इतिहासातही. आजीच्या सुरकुतलेल्या गालावर जी गोड खळी पडली, तिने लाखो लोकांच्या डोळ्यांत पाणी आणलं.
दुकान मालकाने आशीर्वाद म्हणून त्यांच्याकडून फक्त २० रुपयांची एक नोट घेतली आणि म्हणाला, “ही नोट मी माझ्या गल्ल्यात देवाजवळ ठेवेन. हा माझ्यासाठी दागिण्यापेक्षा मोठा आशीर्वाद आहे.”
हसऱ्या चेहऱ्याआड लपलेलं दुःख
या व्हायरल झालेल्या प्रेमाच्या गोष्टीमागे एक मोठी दुःखद कहाणीही आहे. या जोडप्याचा एक मुलगा मरण पावला आहे, तर दुसरा मुलगा व्यसनाच्या आहारी गेला आहे. याच कारणामुळे त्यांनी घरादाराचा त्याग करून माधुकरीचा मार्ग स्वीकारला. दुकानात मुलाची आठवण निघताच दोघांच्याही डोळ्यांत अश्रू तरळले होते. त्यांच्या हसऱ्या चेहऱ्यामागे किती दुःख लपले आहे, याची जाणीव होताच मन अधिकच हेलावतं.
आज सोशल मीडियावर हा व्हिडिओ कोट्यवधी लोकांनी पाहिला आहे. ही केवळ एका दागिन्याची खरेदी नाही, तर ही एका वचनाची पूर्तता आहे. ही त्यागाची, विश्वासाची आणि काळाच्याही पलीकडे टिकणाऱ्या प्रेमाची गाथा आहे. या घटनेने हेच सिद्ध केलं आहे की, “प्रेमाला वयाचं बंधन नसतं आणि माणुसकीचं मोल सोन्याच्या नाण्यांत मोजता येत नाही.” खरंच, प्रेम असावं तर असं आणि माणूस असावा तर असा!
व्हिडीओ पाहा