धाराशिव: आरोग्य विभागात नोकरी लावण्याचे आमिष दाखवून एका व्यक्तीची आठ लाख दहा हजार रुपयांची फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी अंकुश देशमुख आणि संजय यमाजी साळवे या दोघांविरुद्ध धाराशिव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी दत्तात्रय संपत करवर (वय ३८, रा. राघुचीवाडी, ता. जि. धाराशिव) यांना आरोपींनी आरोग्य विभागात नोकरी लावण्याचे आश्वासन दिले होते. यासाठी आरोपींनी १२ ऑक्टोबर २०२१ ते ३१ ऑक्टोबर २०२१ या कालावधीत फिर्यादीकडून रोख आणि ऑनलाइन स्वरूपात एकूण ८ लाख १० हजार रुपये घेतले. ही रक्कम धाराशिव येथील एस.पी. ऑफिससमोरील प्रभात मल्टीस्टेट बँकेच्या शाखेत स्वीकारण्यात आली.
मात्र, पैसे घेऊनही आरोपींनी फिर्यादीस कोणतीही नोकरी लावली नाही. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर दत्तात्रय करवर यांनी १७ जून २०२५ रोजी धाराशिव शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी अंकुश देशमुख (रा. नरखेड, ता. मोहोळ, जि. सोलापूर) आणि संजय यमाजी साळवे (रा. मुंबई) यांच्या विरोधात भारतीय दंड विधान संहितेच्या कलम ४०६ (विश्वासघात), ४२० (फसवणूक) आणि ३४ (समान उद्देश) अन्वये गुन्हा नोंदवला आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.