धाराशिव: शहरात मंगळवारी सायंकाळच्या वेळी एका पादचारी महिलेच्या गळ्यातील सोन्याचे गंठण दुचाकीवरून आलेल्या दोन अज्ञात चोरट्यांनी जबरीने हिसकावून पोबारा केल्याची घटना घडली आहे. शहरातील राधिका बारच्या बाजूच्या रस्त्यावर हा प्रकार घडला असून, यामध्ये महिलेचे सुमारे ७० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.
याप्रकरणी निर्मला रविकांत देशमुख (वय ४३, रा. वैष्णवी नगर, छायादिप लॉन्सच्या पाठीमागे, धाराशिव) यांनी आनंदनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, निर्मला देशमुख या मंगळवारी (दि. १७ जून) सायंकाळी पावणेपाच वाजण्याच्या सुमारास राधिका बारच्या बाजूच्या रस्त्यावरून पायी जात होत्या. यावेळी मोटरसायकलवरून आलेल्या दोन अनोळखी इसमांनी त्यांच्या गळ्यातील १८ ग्रॅम वजनाचे, अंदाजे ७० हजार रुपये किमतीचे सोन्याचे गंठण जबरदस्तीने ओढून चोरून नेले. काही कळायच्या आत चोरटे वेगाने पसार झाले.
या घटनेनंतर निर्मला देशमुख यांनी तात्काळ आनंदनगर पोलीस ठाणे गाठून तक्रार दाखल केली. त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी दोन अज्ञात चोरट्यांविरोधात भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०४(२) अन्वये गुन्हा नोंदवला असून, आरोपींचा शोध सुरू केला आहे. या घटनेमुळे शहरातील महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
कळंब तालुक्यात घरफोडी; बंद घराचे कुलूप तोडून १६ हजारांचा ऐवज लंपास
कळंब तालुक्यातील दाभा गावात एका बंद घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्याने सोन्या-चांदीचे दागिने आणि मोबाईल असा एकूण १६ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. ही घरफोडी सोमवारी रात्री ते मंगळवारी सकाळच्या दरम्यान घडली.
याप्रकरणी अलका अच्युत टेळे (वय ५०, रा. दाभा) यांनी शिराढोण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादीच्या माहितीनुसार, त्यांचे घर सोमवारी (दि. १६ जून) रात्री १० वाजेपासून ते मंगळवारी (दि. १७ जून) सकाळी ६.३० वाजेपर्यंत बंद होते. याच कालावधीचा फायदा घेत अज्ञात चोरट्याने घराच्या दरवाजाचे कुलूप तोडून आत प्रवेश केला.
त्यानंतर चोरट्याने घरातील लोखंडी कपाटात ठेवलेले सोन्या-चांदीचे दागिने आणि एक मोबाईल असा एकूण १६ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेला. मंगळवारी सकाळी हा प्रकार लक्षात आल्यानंतर अलका टेळे यांनी शिराढोण पोलीस ठाण्यात रीतसर तक्रार दाखल केली.त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरोधात भारतीय न्याय संहितेच्या कलम ३३१(४) आणि ३०५ अन्वये घरफोडीचा गुन्हा नोंदवला आहे. शिराढोण पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.