धाराशिव : मौजे मेडसिंगा (ता. धाराशिव) येथील गट क्रमांक २ मधील सुमारे ५० वर्षे जुना शासकीय पाझर तलाव खासगी व्यक्तीने नष्ट करून शासनाच्या मालमत्तेचे नुकसान केल्याचा गंभीर आरोप ग्रामस्थांनी केला आहे. या तक्रारीची तातडीने दखल घेत जिल्हाधिकारी कार्यालयाने धाराशिव तहसीलदारांना या प्रकरणाची सखोल चौकशी करून नियमानुसार कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, मेडसिंगा गावातील ग्रामस्थांच्या वतीने रघुराम किरण आगळे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे अर्ज सादर केला आहे. या अर्जात म्हटले आहे की, गावाच्या पश्चिम बाजूला गट क्रमांक २ मध्ये सन १९७२-७३ साली रोजगार हमी योजनेअंतर्गत दुष्काळ निवारणासाठी एक पाझर तलाव बांधण्यात आला होता. हा तलाव शासनाच्या मालकीचा होता.
ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, या जमिनीचे मूळ मालक कोंडीबा रणदिवे यांचे पुत्र मच्छिंद्र रणदिवे यांनी २०११ मध्ये ही जमीन ज्ञानेश्वर रावसाहेब सूर्यवंशी यांना विकली. सध्याचे मालक श्री. सूर्यवंशी यांनी जेसीबीच्या साहाय्याने हा संपूर्ण पाझर तलाव उद्ध्वस्त करून टाकला आहे, ज्यामुळे शासनाच्या मालमत्तेचे मोठे नुकसान झाले आहे. धक्कादायक बाब म्हणजे, या तलावाच्या बाजूला असलेल्या दलित वस्तीला पाणीपुरवठा करणारी विहीर आणि बोअरवेल देखील बुजवण्यात आल्याचा आरोप अर्जात करण्यात आला आहे.
या गंभीर प्रकाराची तक्रार करत ग्रामस्थांनी रोजगार हमी योजनेअंतर्गत झालेल्या या तलावाच्या कामाची मूळ कागदपत्रे मिळण्याची मागणी केली आहे.
ग्रामस्थांच्या अर्जाची दखल घेत उपजिल्हाधिकारी (रोहयो) प्रवीण धूरपकर यांनी १८ जून २०२५ रोजी तहसीलदारांना एक पत्र पाठवले आहे या पत्रात, अर्जात नमूद केलेल्या मुद्द्यांच्या आधारे तातडीने चौकशी करून नियमांनुसार योग्य ती कारवाई करावी, असे स्पष्ट निर्देश दिले आहेत तसेच, केलेल्या कारवाईची माहिती अर्जदारांना देऊन त्याचा सविस्तर अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयाला सादर करावा, असेही बजावण्यात आले आहे. या पत्राची एक प्रत माहितीसाठी तक्रारदार रघुराम आगळे यांनाही पाठवण्यात आली आहे.
या प्रकरणामुळे ऐन पावसाळ्याच्या तोंडावर गावातील ५० वर्षे जुना पाणीसाठा नष्ट झाल्याने खळबळ उडाली आहे. आता तहसीलदार या प्रकरणी काय चौकशी करतात आणि कोणावर कारवाई होते याकडे संपूर्ण गावाचे लक्ष लागले आहे.