धाराशिव: येथील नगरपालिकेत मुख्याधिकारी पदाचा ‘संगीत खुर्ची’चा खेळ चांगलाच रंगला आहे. अवघ्या चार दिवसांत तीन अधिकारी बदलल्याने पालिकेचा कारभार अक्षरशः वाऱ्यावर गेला असून, ‘आजचा साहेब कोण?’ असा प्रश्न विचारण्याची वेळ कर्मचाऱ्यांवर आली आहे.
ही नाट्यमय घडामोड सुरू झाली ती मुख्याधिकारी वसुधा फड यांच्या दीर्घ मुदतीच्या रजेमुळे , त्या गेले म्हणून अजितकुमार डोके आले, त्यांची एकच दिवसात लातूरला बदली झाली. डोके यांची लातूरला बदली झाल्यानंतर, २७ जून रोजी तुळजापूरचे मुख्याधिकारी अजिंक्य रणदिवे यांच्याकडे अतिरिक्त पदभार सोपवण्यात आला. मोठ्या आशेने आलेले रणदिवे केवळ एक तास खुर्चीत बसले आणि निघूनही गेले. त्यानंतर शनिवार-रविवारच्या सुट्टीने शांतता पसरली.


सोमवारी, ३० जून रोजी सकाळी, दीर्घ रजेवर गेलेल्या वसुधा फड पुन्हा एकदा कार्यालयात दाखल झाल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या. मात्र, त्यांचा हा ‘कमबॅक’ औटघटकेचा ठरला. त्याच दिवशी त्यांच्या बदलीचे आदेश धडकले आणि त्यांना पदभार सोडावा लागला.
आता या ‘संगीत खुर्ची’च्या खेळात नवा प्रवेश झाला आहे तो नगरप्रशासन विभागाचे सहआयुक्त त्र्यंबक ढेंगळे पाटील यांचा. त्यांच्याकडे सध्या पालिकेचा पदभार देण्यात आला आहे. मात्र, या सततच्या बदलांमुळे पालिकेतील १४० कोटींच्या वादग्रस्त रस्ते निविदेचे आणि आगामी प्रभाग रचनेच्या कामाचे भवितव्य टांगणीला लागले आहे.
धाराशिव नगर पालिकेत मुख्याधिकारी यांच्या खुर्चीचा संगीत खेळ सुरु आहे. धाराशिव पालिकेतील प्रशासकीय गोंधळ शिगेला पोहोचला आहे. हा ‘खुर्चीचा खेळ’ आता थांबणार कधी आणि शहराच्या विकासाचे गाडे रुळावर येणार कधी, याकडेच धाराशिवकरांचे डोळे लागले आहेत.