धाराशिव – धाराशिव शहर पोलीस ठाण्यात एका पोलीस अंमलदारावर ५ लाख रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मोबीन शेख असे या अंमलदाराचे नाव असून, तडजोडीअंती त्याने ४ लाख रुपये घेण्याचे मान्य केले होते. जिल्हा सरकारी वकील ऍड. महेंद्र देशमुख यांनी न्यायालयात बाजू मांडल्यानंतर, शेखला धाराशिव कोर्टाने एका दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.
तक्रारदाराने दिलेल्या माहितीनुसार, धाराशिव तालुक्यातील गावसूद येथील शेतजमिनीच्या बांधावरून झालेल्या भांडणाच्या प्रकरणी तक्रारदार, त्यांचे वडील आणि भावाविरुद्ध धाराशिव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास अंमलदार मोबीन शेख यांच्याकडे होता.
या गुन्ह्यात तिघांना अटक न करण्यासाठी शेखने ३ लाख रुपयांची मागणी केली होती. तक्रारदार आणि त्यांचा भाऊ शिक्षण घेत असल्याने, नाईलाजाने ८ एप्रिल २०२५ रोजी दुपारी १ वाजता ३ लाख रुपये दिल्याचा दावा फिर्यादीत करण्यात आला आहे.
३ लाख रुपये दिल्यानंतरही शेखने पुन्हा ५ लाख रुपयांची मागणी केली. तक्रारदाराचा भाऊ आणि वडील भांडणाच्या दिवशी घटनास्थळी नसतानाही त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता आणि तक्रारदाराचा भाऊ पोलीस भरतीचा प्रयत्न करत होता. गुन्ह्यातून नाव कमी करण्यासाठी विश्वासार्ह साक्षीदार आणण्यास सांगून ५ लाख रुपये मागण्यात आले. त्यावेळी तक्रारदाराने एकदाच तोडगा काढून पैसे कमी करण्याची विनंती केली.
अंमलदार शेख याने “मी साहेबांना बोलतो, विचारून सांगतो” असे सांगत ५ लाख रुपयांची मागणी ४ लाखांवर आणली. लाच मागणीच्या पडताळणी पंचनाम्यातही “साहेबांना बोलतो, विचारतो” असे निष्पन्न झाल्यामुळे, ‘तो’ साहेब कोण याचा तपास लाचलुचपत प्रतिबंधक विभाग व्हॉईस रेकॉर्डिंग आणि इतर पुराव्यांच्या आधारे करत आहे. त्या ‘साहेबा’चा शोध घेणे हे लाचलुचपत विभागासमोर एक आव्हान असणार आहे.
दरम्यान, मोबीन शेख यांचे निलंबन करण्यात आले आहे. या प्रकरणात कोणताही अधिकारी निष्पन्न झाल्यास त्याच्यावरही कारवाई केली जाईल, असे पोलीस अधीक्षक ऋतु खोखर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. धाराशिव पोलीस अशा प्रकारच्या गोष्टी सहन करणार नाहीत आणि कडक कारवाई केली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. लाचलुचपत विभाग त्या गुन्ह्याचा तपास करत आहे की, हे पैसे कोणाच्या निर्देशाने मागण्यात आले.