मुरुम – उमरगा तालुक्यातील कोथळी येथे एका बंद घराच्या दरवाजाच्या कुलुपाची कडी कापून अज्ञात चोरट्यांनी आत प्रवेश करत सुमारे दीड लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरून नेल्याची घटना घडली आहे. ही धाडसी चोरी ३० जूनच्या मध्यरात्री घडली असून, याप्रकरणी मुरुम पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नीळकंठ बाबुराव कोट्टरगे (वय ३८, रा. कोथळी, ता. उमरगा) असे फिर्यादीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोट्टरगे यांचे कोथळी येथील घर ३० जून २०२५ रोजी रात्री बंद होते. मध्यरात्री दीड ते सकाळी सात वाजण्याच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घराच्या मुख्य गेटच्या आणि दरवाजाच्या कुलुपाची कडी कटरसारख्या हत्याराने कापून घरात प्रवेश केला.
घरात कोणी नसल्याची संधी साधून चोरट्यांनी कपाटातील २१ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने चोरून नेले. या दागिन्यांची एकूण किंमत १,४८,९५० रुपये असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. घरी परतल्यावर चोरीचा प्रकार लक्षात आल्यानंतर नीळकंठ कोट्टरगे यांनी गुरुवारी, ३ जुलै रोजी मुरुम पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
त्यांच्या फिर्यादीवरून मुरुम पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम ३३१(४) आणि ३०५ अन्वये गुन्हा नोंदवला आहे. पोलीस घटनास्थळाचा पंचनामा करून पुढील तपास करत आहेत. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.