धाराशिव: जुन्या वादाच्या कारणावरून मध्यरात्री घरासमोर लावलेल्या कारची दगड आणि कोयत्याने तोडफोड करून मोठे नुकसान केल्याची घटना शहरातील भानुनगर परिसरात घडली आहे. या हल्ल्यात दीड लाख रुपयांचे नुकसान झाले असून, याप्रकरणी चार जणांविरुद्ध आनंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहरातील शांतीनिकेतन, भानुनगर येथील रहिवासी पंकज संतराव पवार (वय ३०) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. फिर्यादीनुसार, २ जुलै २०२५ रोजी मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास, पवार यांनी त्यांच्या राहत्या घरासमोर लावलेली एमएच २५ एएस ५२२५ या क्रमांकाची कार आरोपींनी लक्ष्य केली.
जुन्या वादाचा राग मनात धरून आरोपी रोहीत जाधव, समीर अरब, प्रेम अमर चव्हाण आणि संदीप यल्लाप्पा बुटे (सर्व रा. धाराशिव) यांनी कारवर दगडफेक केली तसेच कोयत्याने हल्ला करून गाडीच्या काचा व इतर भागांची तोडफोड केली. या हल्ल्यात गाडीचे सुमारे १,५०,००० रुपयांचे नुकसान झाल्याचे पंकज पवार यांनी ४ जुलै रोजी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे.
या तक्रारीवरून आनंदनगर पोलिसांनी चौघा आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम ३२४(५) आणि ३(५) अन्वये गुन्हा नोंदवला आहे. पोलीस आरोपींचा शोध घेत असून पुढील तपास सुरू आहे.