धाराशिव : धाराशिव तालुक्यातील राघुचीवाडी येथे शेतीच्या रस्त्याच्या किरकोळ कारणावरून दोन गटांमध्ये सशस्त्र हाणामारी झाल्याची घटना घडली आहे. रविवारी, दिनांक ६ जुलै २०२५ रोजी सकाळी साडेदहाच्या सुमारास झालेल्या या वादात दोन्ही गटांनी एकमेकांना काठी, कोयता आणि लोखंडी रॉडने मारहाण केली. याप्रकरणी दोन्ही गटांनी एकमेकांविरोधात धाराशिव शहर पोलीस ठाण्यात तक्रारी दिल्या असून, पोलिसांनी परस्परविरोधी गुन्हे दाखल केले आहेत.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पहिली तक्रार राहुल दत्तात्रय करवर (वय २८, रा. राघुचीवाडी) यांनी दिली आहे. त्यांच्या तक्रारीनुसार, रविवारी सकाळी साडेदहा वाजता राघुचीवाडी शिवारात सर्जेराव रामचंद्र करवर, अशोक सर्जेराव करवर आणि आकाश होडगळ यांनी शेतीच्या रस्त्याच्या कारणावरून शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी, कोयता व काठीने मारहाण करून जखमी केले. तसेच, जिवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. या तक्रारीवरून धाराशिव शहर पोलिसांनी तिघांविरोधात भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांनुसार गुन्हा नोंदवला आहे.
यानंतर, दुसऱ्या गटाचे आकाश जनार्धन होळगळ (वय २४, रा. राघुचीवाडी) यांनी देखील फिर्याद दिली आहे. त्यांच्या तक्रारीनुसार, सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास शेत गट नं. ५३१ येथे रोहित दत्तात्रय करवर, राहुल दत्तात्रय करवर आणि दीपक दत्तात्रय करवर यांनी त्यांना व त्यांच्या आजोबांना शेत रस्त्याच्या कारणावरून शिवीगाळ केली. तसेच लाथाबुक्क्यांनी आणि लोखंडी रॉडने मारहाण करून जखमी केले व जिवे मारण्याची धमकी दिली.
एकाच कारणावरून दोन्ही गटांनी एकमेकांविरुद्ध तक्रारी दिल्यामुळे पोलिसांनी दोन्ही प्रकरणांत भारतीय न्याय संहिता कलम ११८(१), ३५२, ११५(२), ३५१(२), ३(५) अन्वये गुन्हे दाखल केले आहेत. या घटनेमुळे राघुचीवाडी परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून, पोलीस पुढील तपास करत आहेत.