मुरुम : लोहारा तालुक्यातील आष्टाकासार येथील एका ज्वेलरी दुकानाचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी सोन्या-चांदीचे दागिने आणि रोख रकमेसह सुमारे १ लाख ६८ हजार रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना घडली आहे. ही घटना सोमवारी रात्री ते मंगळवारी पहाटेच्या दरम्यान घडली असून, याप्रकरणी मुरुम पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आष्टाकासार येथील रहिवासी सुनील महादेव कोकणे (वय ३७) यांचे ‘भाग्यलक्ष्मी ज्वेलर्स’ नावाचे दुकान आहे. सोमवारी, दि. ७ जुलै रोजी सायंकाळी ७ वाजता त्यांनी आपले दुकान बंद केले होते. दुसऱ्या दिवशी, मंगळवारी (दि. ८) पहाटेच्या सुमारास दुकानाचे कुलूप तुटलेले दिसल्याने चोरीचा प्रकार उघडकीस आला.
चोरट्यांनी दुकानात प्रवेश करून २५ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने, १ किलो चांदीचे दागिने आणि गल्ल्यातील रोख ६०,००० रुपये असा एकूण १ लाख ६८ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला.
या घटनेनंतर सुनील कोकणे यांनी तात्काळ मुरुम पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. त्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम ३३१(४) आणि ३०५ अन्वये गुन्हा नोंदवला आहे. पोलीस परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे चोरट्यांचा शोध घेत असून, पुढील तपास सुरू आहे.