तुळजापूर : श्री तुळजाभवानी मातेच्या दर्शनासाठी छत्रपती संभाजीनगर येथून आलेल्या एका ७३ वर्षीय वृद्ध भाविक महिलेच्या गळ्यातील सुमारे दीड लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने, अज्ञात चोरट्याने गर्दीचा फायदा घेऊन चोरून नेल्याची घटना घडली आहे. ही घटना मंगळवारी सकाळी मंदिर परिसरात घडली असून, याप्रकरणी तुळजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जिजाबाई शिवराम आहिरे (वय ७३, रा. अभिनंदन हाउसिंग सोसायटी, पैठण रोड, छत्रपती संभाजीनगर) असे दागिने चोरी झालेल्या वृद्ध महिलेचे नाव आहे. त्या मंगळवारी, दि. ८ जुलै रोजी सकाळी देवदर्शनासाठी तुळजापूर येथे आल्या होत्या. साधारणपणे साडेअकरा वाजण्याच्या सुमारास त्या मंदिर परिसरात असताना, गर्दीचा फायदा घेत कोणीतरी त्यांच्या गळ्यातील ३० ग्रॅम वजनाचे, अंदाजे १ लाख ५० हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरून नेले.
चोरीचा प्रकार लक्षात आल्यानंतर जिजाबाई आहिरे यांनी तात्काळ तुळजापूर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली. त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम ३०३ (२) अन्वये गुन्हा नोंदवला आहे. मंदिर परिसरातील वाढत्या गर्दीचा फायदा घेत चोऱ्यांचे प्रमाण वाढले असून, पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत.