धाराशिव – शहरातील रामनगर भागातील चिरायु हॉस्पिटलसमोरून एका तरुणाची सुमारे ३५ हजार रुपये किमतीची मोटरसायकल अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. ही घटना ३ जुलैच्या मध्यरात्री घडली असून, याप्रकरणी आनंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी प्रवीण बाबुराव राठोड (वय २४ वर्षे, मूळ रा. जळकोट, ता. तुळजापूर) हे सध्या रामनगर येथे राहतात. त्यांनी आपली होंडा कंपनीची मोटरसायकल (क्र. एमएच २५ ए.व्ही. ६१३५) ३ जुलै रोजी रात्री एक वाजण्याच्या सुमारास चिरायु हॉस्पिटलजवळ उभी केली होती.
दुसऱ्या दिवशी सकाळी सहा वाजता त्यांना आपली मोटरसायकल जागेवर दिसली नाही. परिसरात शोध घेऊनही ती न सापडल्याने अखेर त्यांनी ९ जुलै रोजी आनंदनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात आरोपीविरोधात भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०३ (२) अन्वये चोरीचा गुन्हा नोंदवला असून, पोलीस पुढील तपास करत आहेत.
उमरगा बसस्थानकातून कर्नाटकच्या प्रवाशाची मोटारसायकल लंपास; अडीच महिन्यांनी गुन्हा दाखल
उमरगा- उमरगा बसस्थानक परिसरातून तब्बल अडीच महिन्यांपूर्वी चोरीला गेलेल्या मोटारसायकल प्रकरणी आता गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कर्नाटक येथील एका प्रवाशाची सुमारे २० हजार रुपये किमतीची मोटारसायकल चोरट्याने लंपास केली होती. याप्रकरणी उमरगा पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बसवराज साहेबान्ना गुत्तेदार (वय ४८ वर्षे, रा. जवळगा जे, ता. आळंद, जि. कलबुर्गी, कर्नाटक) यांनी ही तक्रार दिली आहे. गुत्तेदार यांची हिरो होंडा कंपनीची मोटारसायकल (क्र. के.ए. ३२ ई.एक्स. ५६०९) दिनांक २६ एप्रिल २०२५ रोजी रात्री २ वाजून १० मिनिटांच्या सुमारास उमरगा बसस्थानक परिसरातून चोरीला गेली होती.
या चोरीच्या घटनेनंतर तब्बल अडीच महिन्यांनी, म्हणजेच ९ जुलै रोजी बसवराज गुत्तेदार यांनी उमरगा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात आरोपीविरोधात भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०३ (२) अन्वये चोरीचा गुन्हा नोंदवला आहे. तक्रार देण्यास इतका विलंब का झाला, यासह पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.