धाराशिव- मोबाईलवर आलेला मेसेज फॉरवर्ड करणे एका शेतकऱ्याला चांगलेच महागात पडले आहे. ई-सिम (e-SIM) ॲक्टिव्हेट करण्याच्या बहाण्याने सायबर चोरट्याने शेतकऱ्याच्या बँक खात्याला १ लाख ८१ हजार २९९ रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी धाराशिव सायबर पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
फिर्यादी खाजा शानुर शेख (वय ५० वर्षे, रा. कोंड, ता. धाराशिव) यांनी यासंदर्भात तक्रार दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २ जुलै ते ७ जुलै २०२५ या कालावधीत ही घटना घडली. शेख हे शेतात असताना त्यांच्या मोबाईलवर एका अनोळखी नंबरवरून (8658093637
) मेसेज आला. त्यानंतर दुसऱ्या नंबरवरून (9341462633
) आलेल्या कॉलवर बोलणाऱ्या व्यक्तीने त्यांना तो मेसेज फॉरवर्ड करण्यास सांगितले.
मेसेज फॉरवर्ड करताच सायबर चोरट्याने श्री. शेख यांच्या मोबाईल नंबरचे ई-सिम ॲक्टिव्हेट करून त्यांच्या सीम कार्डचा पूर्ण ॲक्सेस मिळवला. यानंतर चोरट्याने त्यांच्या महाराष्ट्र बँकेच्या खात्यामधून परस्पर ऑनलाईन व्यवहार करून १,८१,२९९ रुपये काढून घेत त्यांची फसवणूक केली. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच खाजा शेख यांनी ९ जुलै रोजी सायबर पोलीस ठाण्यात धाव घेतली.
त्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या विविध कलमांसह भारतीय न्याय संहितेच्या कलम ३१८(४) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. सायबर पोलिसांनी नागरिकांना अनोळखी नंबरवरून येणारे मेसेज फॉरवर्ड न करण्याचे, ई-सिम ॲक्टिव्हेशनसाठी येणाऱ्या कॉल्सना प्रतिसाद न देण्याचे आणि कोणताही ओटीपी (OTP) शेअर न करण्याचे आवाहन केले आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.