धाराशिव – एकीकडे जिल्ह्यावर दुष्काळाचे सावट कायम असताना, दुसरीकडे गाळमुक्त धरण आणि गाळयुक्त शिवार योजनेच्या नावाखाली कोट्यवधी रुपयांचा गाळ जनतेच्या पैशातूनच लाटला जात असल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. जिल्हा जलसंधारण कार्यालयातील प्रभारी अधिकारी प्रभाकर महामुनी यांनी बोगस शेतकरी, शैक्षणिक संस्था यांच्या नावावर बनावट गाळ काढल्याची कामे दाखवून मोठ्या प्रमाणात निधी उचलल्याचा आरोप करण्यात येत आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकाराने जलयुक्त शिवार अभियान 2.0 अंतर्गत ही योजना सुरू झाली होती. तिचा उद्देश शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवणे व जलसाठा सुधारण्याचा होता. मात्र धाराशिवमध्ये या योजनेचे रूपांतर भ्रष्टाचाराच्या महासागरात झाले आहे. जिल्ह्यातील काही तलावांमध्ये गाळच नसताना तिथेही गाळ काढल्याचे दाखवले गेले आहे. इतकेच नव्हे, तर छत्रपती संभाजीनगरच्या काही शैक्षणिक संस्थांनीही गाळ काढल्याच्या नावाखाली कोट्यवधींची बिले सादर केल्याचे स्पष्ट झाले आहे.
विशेष म्हणजे भूम येथील ‘भाग्यलक्ष्मी सेवाभावी संस्था‘ या एका संस्थेवर तब्बल ६५ कामे एकाच वेळी देण्यात आली आहेत. प्रभाकर महामुनी यांच्यावर आरोप आहे की, त्यांनी टक्केवारीच्या बदल्यात ही कामे मंजूर करून घेतली आणि कोट्यवधी रुपयांचा निधी गाळातच घातला.
माहितीचा अधिकारही पायदळी!
निखिल गंभीरे या सुशिक्षित बेरोजगाराने माहितीच्या अधिकारात यासंबंधी मागणी केली होती. मात्र ४५ दिवस उलटूनही कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. काही ठिकाणी गाळ काढल्याचे दाखवून शेतात गाळ न टाकता खोट्या घनमीटरवर आधारित बिले उचलल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
चौकशीची मागणी
या प्रकरणात जिल्हाधिकारी यांनी उच्चस्तरीय समिती नेमून चौकशी करावी, प्रभाकर महामुनी व त्यांच्या नातेवाईकांनी काय संपत्ती मिळवली, कोणते प्रतिनिधी त्यांच्या मागे आहेत, याचा शोध घेण्याची मागणी होत आहे. अन्यथा न्यायालयाचा दरवाजा ठोठावण्यात येईल, असा इशाराही दिला आहे.
प्रश्न कायम – कोण आहे “बोलवता धनी?”
प्रभाकर महामुनी यांचा जिल्ह्यातील अचानक वाढलेला प्रभाव, अनेक संस्था चालकांची त्यांच्या कार्यालयाबाहेरची गर्दी, तसेच टक्केवारीवर काम वाटप, यामागे कोणता लोकप्रतिनिधी आहे, हेही जिल्ह्यातील जनतेला सतावतंय.