तुळजापूर: तुळजापूर येथील नवीन बसस्थानकात बसमध्ये चढत असताना एका ६० वर्षीय प्रवाशाच्या खिशातील रोख रक्कम गर्दीचा फायदा घेऊन चोरट्याने लंपास केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी एका २० वर्षीय तरुणीवर तुळजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आण्णा एकनाथ जाधव (वय ६०, रा. मोतीझरा, तुळजापूर) असे फिर्यादीचे नाव आहे. ते दिनांक ११ जुलै २०२५ रोजी तुळजापूर-पनवेल बसमध्ये चढत होते. बसमध्ये चढताना झालेल्या गर्दीचा फायदा घेत आरोपी तेजस्वीनी कांतीलाल पवार (वय २०, रा. सावदरवाडी, ता. परंडा) हिने जाधव यांच्या खिशातील ५,६५० रुपये रोख रक्कम चोरून नेली.
आपल्या खिशातील रक्कम चोरीला गेल्याचे लक्षात येताच आण्णा जाधव यांनी तात्काळ तुळजापूर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली. त्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी तेजस्वीनी पवार हिच्या विरोधात भारतीय न्याय संहिता कलम ३०३(२) अन्वये गुन्हा नोंदवला आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.






