वाशी – तालुक्यातील पारा शिवारात एका शेतातील टॉवरवरील ओव्हरहेड ऑप्टिकल ग्राउंड वायर (OPGW) केबल तोडून अज्ञात व्यक्तीने सुमारे एक लाख रुपयांचे नुकसान केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी वाशी पोलीस ठाण्यात अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही घटना ९ जुलै रोजी रात्री ११ ते १० जुलै रोजी सकाळी ६ वाजेच्या दरम्यान पारा शिवारातील शेत गट क्रमांक २४६/अ/१ मध्ये घडली. हे शेत रामा भराटे यांच्या मालकीचे आहे. रिन्यू पॉवर प्रायव्हेट लिमिटेड या खाजगी कंपनीचे कर्मचारी बंडू सर्जेराव मारकड (वय ५५, रा. भूम) यांनी ११ जुलै रोजी याप्रकरणी फिर्याद दिली आहे.
फिर्यादीनुसार, अज्ञात व्यक्तीने शेतातील मनोऱ्यावर चढून ओपीजीडब्ल्यू तार तोडली. यामुळे कंपनीचे अंदाजे १,००,००० रुपयांचे नुकसान झाले. बंडू मारकड यांनी दिलेल्या तक्रारीवरून वाशी पोलिसांनी अज्ञात आरोपीविरोधात भारतीय न्याय संहिता कलम ३२४(५) अन्वये गुन्हा नोंदवला आहे. पोलीस या घटनेचा अधिक तपास करत असून, आरोपीचा शोध सुरू आहे.





